खेळ
महावितरण क्रीडास्पर्धेत कोल्हापूर संघाचे वर्चस्व
By nisha patil - 10/2/2025 12:58:54 AM
Share This News:
महावितरण क्रीडास्पर्धेत कोल्हापूर संघाचे वर्चस्व
बारामती, महावितरणच्या २०२४-२५ राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडास्पर्धेत कोल्हापूर संघाने उत्कृष्ट कामगिरी करत सर्वसाधारण अजिंक्यपद पटकावले. गतविजेता पुणे-बारामती संघाला यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
बारामती येथील विद्यानगरी क्रीडा संकुलात चार दिवस चाललेल्या स्पर्धेचा समारोप शनिवारी (दि. ८) पार पडला. महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली. प्रमुख उपस्थितांमध्ये पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, कार्यकारी संचालक परेश भागवत व अन्य अधिकारी होते.
स्पर्धेत क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, टेनिक्वाईट, कुस्ती, पॉवर लिफ्टिंग आदी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. क्रिकेटमध्ये कोल्हापूर संघाने प्रथम क्रमांक पटकावला, तर व्हॉलीबॉलमध्ये पुणे-बारामती संघाने विजेतेपद मिळवले. वैयक्तिक स्पर्धांमध्ये गुलाबसिंग वसावे, श्वेतांबरी अंबाडे, साईनाथ मसने, मेघा जनघरे यांसारख्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली.
महावितरणच्या क्रीडास्पर्धांमध्ये खेळाचा दर्जा वाढत असून, यंदा क्रिकेट सामने थेट प्रक्षेपित करण्याची नव्याने सुरुवात करण्यात आली. आयोजकांनी केलेल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाबद्दल स्पर्धक व उपस्थितांनी प्रशंसा केली.
महावितरण क्रीडास्पर्धेत कोल्हापूर संघाचे वर्चस्व
|