विशेष बातम्या
कोल्हापूर ते कटिहार साप्ताहिक विशेष एक्सप्रेसचा शुभारंभ; प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल
By nisha patil - 7/4/2025 3:40:04 PM
Share This News:
कोल्हापूर ते कटिहार साप्ताहिक विशेष एक्सप्रेसचा शुभारंभ; प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल
उन्हाळी सुट्यांमध्ये उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांसाठी कोल्हापूर-कटिहार विशेष साप्ताहिक एक्सप्रेसचे रविवारी छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवरून उदघाटन झाले. उद्योजक हरीश जैन आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी मार्गस्थ करण्यात आली.
सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ही विशेष गाडी अत्यंत सोयीची ठरली असून, सुरूवातीच्या चारही फेऱ्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले आहे.
कोल्हापूर फर्स्टचे समन्वयक सुरेंद्र जैन, अरिहंत जैन फाउंडेशनचे जयेश ओसवाल, रेल्वे सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, इंजिनिअरिंग असोसिएशनचे बाबासाहेब कोंडेकर, ग्राहक पंचायतीचे सुहास गुरव, स्थानकप्रमुख आर. के. मेहता यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
रेल्वे इंजिनला पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवण्यात आला. या गाडीचे चालक कोल्हापूरचे सुपुत्र मिलिंद उलपे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.
उत्तर भारताशी जोडणारी गाडी सुरू करण्याची मागणी गेल्या ५० वर्षांपासून सुरू होती. या मागणीसाठी रेल्वे प्रवासी संघटनेमार्फत पाठपुरावा करण्यात आला होता. खासदार धनंजय महाडिक यांनी रेल्वे मंत्रालयाकडे यासाठी विशेष प्रयत्न केले.
ही विशेष गाडी सांगली, पुणे, अहमदनगर, मनमाड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, प्रयागराज, अयोध्या, पाटलीपुत्र, हाजीपूर, बेगुसराय या प्रमुख स्थानकांवर थांबेल. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या मार्गावर कायमस्वरूपी रेल्वे सुरू करण्याची मागणी ग्राहक पंचायतीने केली आहे.
कोल्हापूर ते कटिहार साप्ताहिक विशेष एक्सप्रेसचा शुभारंभ; प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, सर्व फेऱ्यांचे आरक्षण फुल्ल
|