राजकीय
कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार
By nisha patil - 11/18/2024 10:59:47 PM
Share This News:
कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार
आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती, दक्षिणच्या विकासाचा संकल्पनामा
कोल्हापूर, : कोल्हापूर दक्षिणला नवा चेहरा देण्यासाठी दक्षिण व्हिजन 2.0 च्या माध्यमातून नवसंकल्पना राबवणार आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वाधीक वेगाने वाढणा-या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यावरसुध्दा माझा भर असेल. विविध क्षेत्रातील तज्ञ, युवा पिढी यांना सोबत घेऊन कोल्हापूर थिंक टँकची यासाठी मदत घेणार आहे. यासाठी युवा पिढीने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले.
साने गुरुजी वसाहत येथे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, सुरज देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.आ.पाटील म्हणाले, इंडस्ट्री एरियासाठी आवश्यक फॅसिलिटी, आयटी कंपन्यांसाठी फॅसिलिटी तसेच नवीन आयटी कंपन्यांना एमआयडीसीच्या दरामध्ये शेंडा पार्क परिसरात जागा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. मिशन रोजगार अंतर्गत छोटे स्टार्टप्स आणि बिझनेस सुरू करण्यासाठी फॅसिलिटेटर म्हणून काम करणार आहे. त्याचबरोबर मार्केटसाठी आवश्यक असणाऱ्या स्किलड लेबरची माहिती घेऊन आवश्यक स्किल ट्रेनिंग देऊन युवा पिढीची रोजगारक्षमता वाढवणार आहे. मिशन रोजगार संकल्पनेची व्याप्ती वाढवून युवा पिढीला जॉब मिळवून देण्यावर विशेष भर देऊ. मोबाईल फोनपासून मुक्त असणाऱ्या पब्लिक रिडींग स्पेसेस निर्माण करणार असून जनतेच्या सोयीसाठी चालते फिरते ‘जनहित केंद्र’ सुरु करणार आहे. पर्यावरण संवर्धन पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक ठिकाणी झाडे लावून ग्रीन झोन तसेच ऑक्सिजन पार्क तयार करणार आहे. गावतलावांचे संवर्धन, सुशोभिकरण यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ.
महिला सक्षमीकरण महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य तसेच महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणार आहे. विविध कंपन्यांच्या बिझनेस आऊटसोर्सिंग मधून महिलांसाठी घरबसल्या उद्योग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. महिलांमध्ये तसेच शालेय मुलींमध्ये आरोग्यविषयक जागृती तसेच हेल्थ कॅम्पचे आयोजन करणार आहे.
स्मार्ट स्कूल व आरोग्य सुविधा उंचगाव येथील स्मार्ट स्कूलच्या धर्तीवर जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या प्राथमिक शाळांना दर्जेदार सुविधा देऊन स्मार्ट स्कूल ही संकल्पना अधिक व्यापक करणार आहे. दक्षिणमधील प्राथमिक आरोग्य केंद्रांना निधी देऊन लोकांसाठी चांगल्या आरोग्य सुविधा देणार. साळोखे नगर विरंगुळा केंद्राच्या धर्तीवर ग्रामीण भाग तसेच उपनगरांमध्ये विरंगुळा केंद्र उभारणार आहे.
सार्वजनिक सुरक्षा सार्वजनिक ठिकाणी शासन निधी तसेच लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार आहे. महाविद्यालय तसेच विविध संस्थांमध्ये ट्रॅफिक जनजागृती अभियान राबविले जाईल. पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम सक्षम करण्यासाठी केएमटीला बसेस उपलब्ध करून देणार आहे.
पाणी सुविधा व कचरा व्यवस्थापन मुबलक व स्वच्छ पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा करेन शहरात थेट पाईपलाईन पाणी वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
ग्रामीण भागातील कचरा उठाव करून कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा तसेच महापालिकेच्या माध्यमातून उपनगरातील कचरा उठाव प्रभावीपणे व्हावा यासाठी पाठपुरावा करू.
क्रीडा विकास ग्रामीण व शहरी भागात उपलब्ध जागांमध्ये क्रीडांगण विकसित करणार आहे. दर्जेदार स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून देण्याबरोबरच मतदारसंघात इनडोअर स्पोर्टस स्टेडियम उभारण्यासाठी प्रयत्नशील राहीन.
करिअर लाईट हाऊस उपनगर परिसर आणि ग्रामीण भागामध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार अभ्यासिका उभारणार, करिअर लाईट हाऊस संकल्पना राबवून युवा पिढीला करिअर निवडण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले जाईल. शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच उत्पादन वाढीसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, क्षेत्रभेटीचे आयोजन करणार आहे.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघ अधिक प्रगतीपथावर नेण्यासाठी मी आखलेल्या विविध योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्या सर्वांचे भक्कम पाठबळ मिळावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी किरण पाटील, दिग्वीजय मगदूम, मयूर पाटील, इजाज नागरगट्टी यांच्यासह तरुण-तरुणी उपस्थित होत्या.
कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार
|