बातम्या

कोल्हापूरकरांनी मातब्बरांना घरी बसवले आहे?

Kolhapurkars have made Matabbars sit at home


By nisha patil - 3/16/2024 4:42:12 PM
Share This News:



पांडुरंग फिरींगे कोल्हापूर : प्रतिनिधी उमेदवार जाहीर झाल्यानंतरच कोल्हापुरात जाळ अन् धूर..! काय आहे स्थिती?  कोल्हापूरमधील राजकीय स्थितीचा कधीच अंदाज येत नाही. मतदारांनी प्रत्येकवेळी मातब्बरांना घरी बसवलं आहे. या निवडणुकीत मतदार कुणाला साध देणार, याबाबत उत्सुकता आहे.
 
लोकसभा निवडणूक  2024) असो की विधानसभा निवडणूक कोल्हापूरच्या राजकारणाचा अंदाज राज्याच्या नव्हे तर देशाच्या राजकारणात चतुर समजल्या जाणाऱ्या चाणक्यालादेखील लागलेला नाही. जो इतिहास देशात व राज्यात घडतो तो इतिहास कधीच कोल्हापुरात घडत नसल्याचा आजवरचा इतिहास आहे. जिल्ह्यातील राजकीय डावपेचांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय नेते वेस ओलांडून देशाच्या नेतृत्वापर्यंत गेलेले नाहीत. याचे मूळ कारण म्हणजे कोल्हापूरच्या जनतेने राजकारणातील न दिलेला अंदाज आणि लोकप्रतिनिधी यांच्यात होणारे कुरघोड्याचे राजकारण. काही दिवसांपूर्वी विधिमंडळाच्या अधिवेशनातील आमदार रोहित पवार  आणि आमदार सतेज पाटील यांचा व्हायरल व्हिडिओ चांगलाच गाजला होता. त्यामध्ये कोल्हापूरच्या राजकारणात कोणाला निवडून आणायचं, त्यापेक्षा कोणाला पाडण्याचं ठरवलं जातं, असं विधान होतं. हीच कोल्हापूरची  ओळख बनली आहे. उमेदवारी यादीत उदयनराजेंचं नाव नसल्याने साताऱ्यात समर्थक आक्रमक!

 

मागील दोन लोकसभा निवडणुकीचा आढावा घेतला तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात प्रचंड चुरस आणि इर्षा पाहायला मिळाली. संपूर्ण देशात मोदी लाट असताना कोल्हापूर मतदारसंघात 2014 मध्ये मात्र राष्ट्रवादीचा  खासदार निवडून आला. त्यावेळी कोल्हापूरकरच्या जनतेने ठरवले होते, तर 2019 च्या निवडणुकीत जनतेनेच निवडणूक हातात घेऊन राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता. जर कोल्हापूरकरांना वाटलं उमेदवारावर अन्याय झाला आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. त्याला निवडून आणण्यासाठी जनताच ठरवते. हाच इतिहास आजपर्यंतच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळाला आहे.
 

याचीच भीती आणि धसका कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे दिसताे. जिल्ह्याच्या राजकारणात उमेदवारीवरून बरीच चढाओढ निर्माण झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यातील राजकीय वातावरण तापलं असलं तरी कोल्हापुरातील लोकप्रतिनिधींनी राजकारणातील संयम अजून तरी सोडलेला नाही. प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा वाढली असून, गुपित शत्रू आणि गुपित मैत्री टिकवण्यासाठी संभाव्य विरोधकांवरही थेट टीका करण्याचे सध्यातरी टाळताना दिसून येत आहेत.
मागील लोकसभा निवडणुकीत जे एकमेकांच्या विरोधात होते तेच आता एकमेकांचे मित्र बनले आहेत. शिवाय मागील पाच वर्षांत जे मित्र होते ते आता विरोधात आहेत. त्यामुळे अनेकांच्या राजकीय मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. राजकीयदृष्ट्या सर्वांचीच महत्त्वाकांक्षा वाढली असून, प्रत्येक लोकप्रतिनिधीचे राज्यासह केंद्रीय नेतृत्वाकडे ओढा वाढला आहे.

 

लोकसभेच्या धामधूमीत संभाजीराजेंची वेगळीच चर्चा; लवकरच नव्या भूमिकेत
महाविकास आघाडीमध्ये  उमेदवार ठरवण्यापासून ते उमेदवार निश्चित करेपर्यंत आमदार सतेज पाटील यांची भूमिका महत्त्वाची आहे, तर महायुती आघाडीत राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका महत्त्वाची आहे. आमदार सतेज पाटील यांना राज्यस्तरावर नेतृत्वाची ओढ लागली आहे. महाडिक यांनादेखील केंद्रीय नेतृत्वाची ओढ लागली आहे. अशा परिस्थितीत या दोघांसह आगामी लोकसभा निवडणुकीत सुरुवातीला सावध पवित्रा घेतला आहे. कोणावरही थेट टीका न करता अधिकृत उमेदवाराच्या घोषणेची वाट पाहत आहेत.दोन दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी देखील शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक यांच्यावर थेट टीका करणे टाळले होते. शिवाय खासदार मंडलिक यांनीदेखील विरोधातील उमेदवार आणि स्वपक्षातील नेत्यांवर थेट बोलणे टाळले. अजूनही काहीजण पत्ते खोलण्यास तयार नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या जनतेचा राजकीय अंदाज अजून कोणत्याच नेत्याला उमगला नाही.

 

एकंदरीतच ज्यावेळी उमेदवारीची घोषणा होईल, त्यावेळी राजकारणातील अनेक डावपेच कळायला सुरुवात होईल. जनतेचा अंदाज काहीअंशी लागेल. त्यावर स्वार होऊन निवडणुकीत मैदान मारण्याची योजना दोन्ही आघाडीतील नेत्यांची आहे. त्यामुळे एकदा उमेदवार घोषित झाला की, कोल्हापुरात राजकीय उद्रेक नकळत बाहेर येईल. हे नाकारता येऊ शकत नाही.


कोल्हापूरकरांनी मातब्बरांना घरी बसवले आहे?