बातम्या

कोल्हापूरची रणरागिनी अंजू तुरंबेकर यांच्या शिरपेचात झी मराठीचा मानाचा तुरा

Kolhapurs Ranragini Anju Turambekar is the leader of Zee Marathi


By nisha patil - 8/29/2023 7:53:24 PM
Share This News:



झी मराठी वाहिनी मार्फत स्त्री कर्तुत्वाचा सन्मान करण्याकरिता दिल्या जाणाऱ्या "उंच माझा झोका" या बहुमोल पुरस्काराने आपली कोल्हापूरची रणरागिनी  कु. अंजू तुरंबेकर यांना दि. २७ ऑगस्ट २०२३ रोजी मुंबईमध्ये पार पडलेल्या हया दिमाखदार सोहळ्यामध्ये गौरविण्यात आले. या सोहळ्यामध्ये अनेक मराठी कलाकार व ईतर पुरस्कर्ते उपस्थित होते. फुटबॉल क्षेत्रामध्ये केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आणि स्वतः स्थापित केलेल्या एटी फाऊंडेशन व अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागात राहणाऱ्या घटकांपर्यंत क्रीडासंस्कृती पोहोचवून या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या दिलेल्या योगदानाबद्दल त्या या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. आशियाई फुटबॉल महासंघाच्या ग्रासरूट डेव्हलपमेंट पॅनलवर निवड झालेल्या अंजू तुरंबेकर यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर फुटबॉल क्षेत्रात काम करण्याचा अनुभव आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुटबॉल क्षेत्रातून पुरस्कार प्राप्त करणार्‍या त्या एकमेव महिला ठरल्या आहेत. 
कोण आहेत अंजू तुरंबेकर?
गडहिंग्लज तालुक्यातल्या बेकनाळ या छोट्याशा गावात अंजू तुरंबेकर यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच प्रचंड प्रयोगशील आणि धाडसी असणाऱ्या अंजूने आयुष्यात काहीतरी वेगळं करायचं आहे हा निश्चय केला होता. 

 

मात्र हा प्रवास जिवंत सोपा नव्हता. अगदी कोवळ्या वयातच त्यांना शेतात राबावं लागलं, घरच्यांशी भांडून शाळेत शिकावं लागलं. शेतात नांगरणी, कोळपणी अशी काम तर त्यांना येतच होती पण शाळेतल्या मैदानावरही त्यांनी अगदी लहान वयातच पाऊल ठेवलं होतं. शालेय स्तरावर लंगडी, खो-खो अशा खेळांमध्ये त्या तरबेज झाल्या होत्या. 
नववीत आल्यावर त्यांनी शाळेच्या नोटीस बोर्डावर एक कागद चिकटवलेला पाहिला. त्या छोट्याशा शहरात फुटबॉलवर प्रेम करणाऱ्या काही लोकांनी 'मास्टर्स स्पोर्ट्स क्लब' नावाने एक क्लब सुरु केला होता. त्या क्लबला मुलींचा फुटबॉल सुरु करायचा होता. ते पोस्टर पाहिलं आणि अंजू थेट मैदानावर पोहोचल्या. खरंतर फुटबॉल म्हणजे काय हे त्यांना त्यावेळी माहीतही नव्हतं. त्यांना क्रिकेट आवडायचं पण अखेर त्या तिथे गेल्या आणि पायात बूटही नसताना त्यांनी पहिल्यांदाच फुटबॉलला स्पर्श केला. 

बेकनाळमध्ये एखाद्या मुलीने फुटबॉल खेळणे ना समाजाला मान्य होते ना अंजु यांच्या कुटुंबियांना. फुटबॉलमुळे त्यांना घरच्यांचा प्रचंड मार खावा लागला,प्रसंगी दवाखान्यात अ‍ॅडमिट व्हावं लागलं. पण, फुटबॉलमुळे मिळालेल्या आत्मविश्वास आणि स्वातंत्र्याची गोडी एवढी होती की अंजू तुरंबेकर यांनी कधीच हार मानली नाही.  आधी शालेय पातळीवर, नंतर राज्यपातळीवर आणि मग महाराष्ट्राची कर्णधार म्हणून राष्ट्रीय पातळीवर अंजू तुरंबेकर यांनी फुटबॉल खेळात यश व नावलौकिक मिळवले. 
आजकाल खेळात करियर होतं, यावर पालकांचा विश्वास बसू लागलाय. मात्र राष्ट्रीय पातळीवर खेळूनही अंजू तुरंबेकर यांच्या कुटुंबियांना त्यांचं खेळणं मान्य नव्हतं. त्यामुळे त्यांना जबरदस्तीने पोलिस भरतीसाठी पाठवून देण्यात आले पण फुटबॉल या खेळावरील प्रेमाखातर त्या तिथून पळून गेल्या. घरातून पळून आल्यानंतर त्यांनी पुण्यातील एका क्लबकडून खेळायचे ठरवले. पुण्यातला प्रवासही अजिबात सोपा नव्हता. कधी लोकांची धुणीभांडी करून, कधी पेट्रोल पंपावर काम करून तर कधी उपाशी राहून त्यांनी पुण्यातले दिवस काढले पण फुटबॉलवरचा पाय मात्र निघाला नाही. अत्यंत कठीण परिस्थितीत त्या खेळत राहिल्या. 
फुटबॉल क्षेत्रातील योगदान:
अनेक वर्ष हा खेळ खेळल्यानंतर त्यांनी फुटबॉल व्यवस्थापन क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज 15 वर्षांहून अधिक काळ त्या फुटबॉल क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्या त्यांच्या नेतृत्व कौशल्ये, कार्य नैतिकता, व्यावसायिकता, मार्गदर्शन कौशल्ये, लोकांना शिक्षित करणे आणि पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या या क्षेत्रात स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी उमटवलेला ठसा अमीट आहे.  

अंजू तुरंबेकर यांची फुटबॉल व्यवस्थापनातील कारकीर्द :
- सुरुवातीच्या काळात 6 वर्षे मॅजिक बस या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गरीब मुला मुलींना फुटबॉल शिकविले व ट्रेनर म्हणून देखील काम केले 
- AIFF(All India Football Federation) च्या ग्रासरूट विकास प्रोग्रामचे नेतृत्व आणि देशातील फुटबॉल इकोसिस्टमचा पाया उभारण्यासाठी मोलाचा हातभार लावला व अनेक वेळा भारताला AFC चे  अनेक अवॉर्ड देखील मिळवून दिले 
- देशातील सर्वात तरुण AFC(Asian Football Confederation) 'A' परवानाधारक प्रशिक्षिका म्हणून बहुमान पटकावला
- भारतातील पहिल्या महिला AFC पॅनेल सदस्या आणि तांत्रिक तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तिने आजवर आशिया खंडातील अनेक देशांचे काम पाहिले आहे
- FIFA U17 वर्ल्ड कप, MXIM प्रोग्राम च्या टेक्निकल हेड म्हणून काम पाहिले
- प्रशिक्षकांना शिक्षण देणारी भारतातील पहिल्या महिला 
- भारतातील प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'डेम्पो मेन्स स्पोर्ट्स क्लब'मध्ये तांत्रिक संचालक म्हणून कार्य करणाऱ्या अंजू तुरंबेकर या आशियातील पहिल्या महिला ठरल्या होत्या. पुरुष क्लबमध्ये एखादी महिला तांत्रिक संचालक होणं ही घटना भारतीय आणि आशिया खंडाच्या फुटबॉल इतिहासात आजपर्यत घडली नव्हती
- 2022 मध्ये तिने एशियन फुटबॉल वुमेन्स कप मध्ये टेक्निकल अॅनालिस्ट  म्हणुन काम पाहिले
- केवळ खेळाडूंनाच नाही तर अंजू तुरंबेकर यांनी भारतातील अनेक फुटबॉल प्रशिक्षकांना देखील प्रशिक्षित केलेलं आहे

एटी फाऊंडेशन आणि अडॅप्ट फुटबॉल अकॅडमीच्या माध्यमातून योगदान:
ग्रामीण भागातील मुला मुलींना कोणतीही भीती न बाळगता स्वप्ने पाहता यावीत आणि ती पूर्ण करावयाची जिद्द ठेवावी तसेच ग्रामीण भागातील मुलामुलींना फुटबॉल या खेळाचे आधुनिक आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेता यावे आणि जीवन कौशल्ये आणि मूलभूत कौशल्ये शिकवण्यासाठी त्यांनी "अडॅप्ट फुटबॉल अकॅडमी" आणि "एटी फाऊंडेशन" ही संस्था स्थापन केली आहे. या मधून सध्या खेडेगावात 150 मुले-मुली प्रशिक्षण घेत आहेत. तसेच स्वतः सारखे अजून लीडर तयार व्हावेत यासाठी त्यांनी खेडेगावात स्वत: जाऊन 1018 मुलामुलींना नेतृत्व गुण विकासाचे प्रशिक्षण दिले आहे.
एटी फाउंडेशन आणि अडॅप्ट अकॅडमीच्या माध्यमातून तळागाळातील, प्रत्येक वयोगटाच्या माणसाचे खेळाशी असणारे नाते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अंजू तुरंबेकर यांची ही संस्था कोल्हापूर आणि अहमदनगर या दोन जिल्ह्यांच्या ग्रामीण भागामध्ये काम करते. फुटबॉलचे प्रशिक्षण तर यामध्ये दिलेच जाते पण माजी सैनिकांसाठी फुटबॉल स्पर्धा, महिलांसाठी व मुलींसाठी वेगवेगळी प्रशिक्षणे देखील घेण्यात येतात. 

जिद्द आणि चिकाटी असेल तर माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो याचेच एक जीवंत उदाहरण म्हणजेच बेकनाळ या छोट्याश्या गावातील अंजू तुरंबेकर. आपले आयुष्य शून्यातून घडवून, स्वतःची स्वप्ने पूर्ण करत दुसर्‍याच्या स्वप्नांना पंख देणार्‍या अंजू तुरंबेकर यांची सर्वत्र वाहवा होत आहे.


कोल्हापूरची रणरागिनी अंजू तुरंबेकर यांच्या शिरपेचात झी मराठीचा मानाचा तुरा