विशेष बातम्या
वडाचीवाडीची लेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी..
By nisha patil - 10/2/2025 7:13:44 PM
Share This News:
वडाचीवाडीची लेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी..
राधानगरीची लेक मुंबई पोलीस दलात सन्मानाने रुजू
दुर्गम मातीतून तेजस्वी स्वप्नांचा अंकुर
कोल्हापूर प्रतिनिधी – विक्रम केंजळेकर
राधानगरी तालुक्यातील दुर्गम वडाचीवाडी गावातील एक साधी मुलगी, जिच्या मनात लहानपणापासूनच पोलीस होण्याचं स्वप्न होतं. त्या स्वप्नासाठी तीने कष्टाची वाट निवडली आणि शेवटी यशस्वी होऊन वडाचीवाडी गावाची पहिली मुंबई पोलीस अधिकारी होण्याचा मान पटकावला. सानिका संजय पाटील हिचा हा यशस्वी प्रवास आज अनेक तरुण-तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सानिका पाटील हिचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला. ग्रामीण भागातील अनेक अडचणींना सामोरे जात तिने आपले शिक्षण पूर्ण केले. तिच्या घरातील परिस्थिती मध्यमवर्गीय होती, परंतु आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाने तिला शिकण्यासाठी पाठबळ दिले. लहानपणापासूनच पोलीस व्हायचे हे तिचे स्वप्न होते. त्या स्वप्नासाठी तिने जिद्दीने मेहनत घेतली.
तिच्या कुटुंबीयांनीही तिच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले. आई-वडील, आजी-आजोबा, चुलते, चुलती, काका, मावशी, तसेच शिक्षक यांचे मार्गदर्शन तिला सतत मिळत राहिले. तिच्या यशामागे तिच्या कठोर परिश्रमासोबतच कुटुंबीयांचे प्रोत्साहनही महत्त्वाचे ठरले.
ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत रुजू होऊ शकतात, हे सानिकाने आपल्या कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. मुंबई पोलिस दलात निवड होण्यासाठी तिने कठोर मेहनत घेतली. सातत्याने अभ्यास, शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि जिद्द यांच्या जोरावर तिने मुंबई पोलीस दलात आपले स्थान पक्के केले.
तिच्या या यशामुळे केवळ वडाचीवाडी नव्हे, तर संपूर्ण राधानगरी तालुक्यात अभिमानाची लाट उसळली आहे. तिच्या आई-वडिलांसह शिक्षक, गावकरी आणि संपूर्ण कुटुंबीयांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
सानिकाचा हा प्रवास केवळ तिच्यासाठीच नाही, तर ग्रामीण भागातील असंख्य तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. शिक्षण, चिकाटी आणि कठोर मेहनतीच्या जोरावर कोणतीही स्वप्ने पूर्ण करता येऊ शकतात, हे तिने सिद्ध केले आहे.
वडाचीवाडीची लेक महाराष्ट्राच्या रक्षणासाठी..
|