बातम्या

शेवटचा निरोप समारंभ

Last farewell ceremony


By nisha patil - 1/29/2024 7:59:26 AM
Share This News:



आज आयुष्यात पहिल्यांदाच
तिला इतका मानपान मिळाला, 
असा मानपान मिळण्यासाठी
तिने पुनः जन्मा यावे
असा विचार क्षणभर डोकावला...

आज तिच्या घरी सर्वच आले, 
माहेरचे, सासरचे, मानाचे 
अन पानाचे... 
तिने नाही कुणाच्या 
पायाला हात लावला, 
तरी कुणालाच तिचा 
राग नाही आला...
खरचं आज तिचा 
पाहुणचार वेगळाच झाला...
खरंच हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

ती आज पहाटे उठली नाही, 
म्हणून कुणीच तिला 
हटकले नाही... 
उशिरा का असेना तिने उठावे
सगळ्यांनीच तिच्या विनवण्या केल्या, 
खरंच आयुष्यात असा 
क्षण पहिल्यांदा आला... 
हा शेवटचा निरोप 
समारंभ थाटात पार पडला...

नेहमीच आटप म्हणून
कटकट करणारा नवरा
आज स्वतःच तिची 
तयारी करायला लागला, 
तिने त्याचं 
आज्ञा पालन नाही केलं
तरी साश्रू प्रेमाने तिला 
भिजवू लागला... 
खरंच आयुष्यात पहिल्यांदाच
नवऱ्याच्या मनाचा ठाव लागला... 
हा शेवटचा निरोप 
समारंभ थाटात पार पडला...

तिची नवी साडी नेहमीच
हसण्याचा विषय झाला, 
आज सर्वांनी तिला 
पैठणीचा आहेर दिला...
खणखणत्या बांगड्यांचा
चुडा भरला, 
तरी आज कुणाच्या डोळ्यात 
उपहास नाही दिसला... 
खरंच आयुष्यात पहिल्यांदा 
तिच्या सौंदर्याचा गौरव झाला... 
खरंच हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

आज तिच्या डोळ्यात
स्मित हास्य, 
दुसऱ्यांच्या डोळ्यात मात्र
आसवांचं रहस्य... 
तिचे हात कुणाचे 
अश्रू नाही पुसायला गेला, 
तरी प्रत्येकजण तिच्यासाठी हळहळला... 
खरंच आयुष्यात पहिल्यांदाच 
जग तिच्यासाठी रडला... 
हा शेवटचा निरोप 
समारंभ थाटात पार पडला...

आज तिला कुणाचीच
पर्वा नव्हती, 
सगळ्या बंधनातून ती मुक्त होती... 
आक्रोश करून पुनः तिला
बंधनात अडकवण्याचा प्रयत्न केला, 
आज पहिल्यांदा जगाला
तिचा मोह झाला... 
खरचं हा शेवटचा निरोप 
समारंभ थाटात पार पडला...

जिवंतपणी नेहमीच तिच्यावर
जबाबदारी राहिली, 
थोडीशी चुकली तर 
तिला धारेवर धरली... 
आज सर्व त्यागून ती 
निर्धास्त झाली, 
तरी गुलाबाची शेज सजवून
सर्वांनी तिची कदर केली... 
आज पहिल्यांदा
काट्याशिवाय गुलाब 
तिच्या वाट्याला आला... 
खरंच हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...

आज प्रत्येकाने तिचा
सोहळा पाहिला, 
बाकी ती शांत होती 
तिला पाठवणारा प्रत्येकजण रडला... 
घरचाही रडला, दारचाही रडला, 
पाठचाही रडला, पोटचाही रडला... 
लहानही रडला, मोठाही रडला, 
जेव्हा नवऱ्याने हंबरडा फोडला... 
मुलांनी एकच गलका केला, 
तेव्हा तिच्या स्त्रीपणाला 
खरा अर्थ प्राप्त झाला...
खरचं हा शेवटचा निरोप
समारंभ थाटात पार पडला...


शेवटचा निरोप समारंभ