बातम्या

जाणून घ्या कानाच्या समस्या व कारणे

Learn about ear problems and causes


By nisha patil - 3/16/2024 7:16:57 AM
Share This News:



 आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपली जीवनशैली अलीकडच्या काळात आमूलाग्र बदलली आहे. ध्वनिप्रदूषण वाढल्यामुळे कानाचे आरोग्य बिघडू लागले आहे. जगात तब्बल ३६० दशलक्ष लोक कानाच्या कुठल्या ना कुठल्या तरी समस्येने ग्रस्त आहेत. थोडक्यात ५.३ टक्के लोकसंख्येला कानाच्या समस्या आहेत. मात्र, या समस्या टाळणे किंवा यावर प्रतिबंध करणे शक्य आहे. म्हणून कानाच्या समस्या व जोखमीच्या घटकांवर लक्ष देणे गरजेचे आहे.

वयाशी निगडित ऐकण्याच्या समस्या या पन्नाशीनंतर काही अंशी सुरू होतात. यावर हिअरींग एड उपकरणे उपयुक्त ठरतात. मात्र, बरीच लोक याचा वापर करत नाहीत आणि त्यामुळे आपल्या कुटुंबाशी किंवा स्नेहींशी संवाद साधताना याचा परिणाम होतो. ऐकण्याच्या समस्या या कधी-कधी अनुवंशिकदेखील असू शकतात आणि याचे लवकर निदान झाल्यास त्यावर उपचार होऊ शकतात.

कानाच्या समस्या उद्धभवण्यास कारणीभूत घटक –
गरोदरपणामध्ये होणारा संसर्ग, सतत नाकात-घशात होणारा संसर्ग, कान साफ करण्याकरिता विविध वस्तूंच्या वापराने होणा‍ऱ्या जखमा, कानात होणारा संसर्ग, मेंदूला झालेली दुखापत, खोलवर समुद्रात (डीप सी डायव्हिंग) उडी मारल्याने कानातील दाबामध्ये आलेले अचानक बदल, विविध वैद्यकीय स्थिती जसे मधुमेह, व्हायरल इन्फेक्शन, मूत्रपिंडाच्या समस्या, थायरॉईड, टीबी व ध्वनी प्रदूषण हे जोखमीचे घटक आहेत. उपचार पद्धती व शस्त्रक्रियांमध्ये झालेल्या लक्षणीय सुधारणांमुळे अनेक समस्यांवर मात करता येते.आपले कान हे नाकाच्या मागील भागास जोडलेले असतात आणि त्यामुळे कानाला होणाऱ्या समस्यांचा प्रभाव नाकावर देखील पडू शकतो. विविध परिस्थितींचा कानाच्या कामकाजावर परिणाम होऊ शकतो.

ओटीटीस मीडिया –
भारतात सर्वसामान्यपणे कानाच्या बाबतीत आढळणारी समस्या म्हणजे ओटीटीस मीडिया हा एक प्रकारचा संसर्ग असतो. याची सुरुवात नाक व घशाच्या संसर्गाने होते. यामुळे कानाच्या पडद्यात भोक पडून किंवा खड्डा पडून त्याला निकामी करतात. याच्यावर उपचार केले नाहीत, तर प्राणघातक ठरू शकते. मात्र, औषध किंवा गरज भासल्यास शस्त्रक्रियेद्वारे या समस्येवर पूर्णपणे मात करता येते.

लहान मुलांच्या कानाच्या समस्या –
बऱ्याच वेळा मुले ५ ते ६ वर्षांची होऊपर्यंत या समस्या लक्षात येत नाहीत आणि त्यानंतर जरी लक्षात आल्या तरी मुलांच्या बोलण्यावर परिणाम होऊ शकतो. कारण, ऐकण्याचा आणि बोलण्याचा थेट संबंध असतो. व्यवस्थित ऐकू येत असले तरच बोलण्याचा विकास होऊ शकतो. बरेचशा हॉस्पिटलमध्ये आता नवजात शिशुंसाठी हिअरींग स्क्रीनिंग चाचण्या (ओएई) असतात. त्याद्वारे बाळ अगदी २ ते ३ दिवसांचे असतानाच ऐकण्याच्या बाबतीत समस्या असेल, तर कळू शकते. पालकांनी आपली मुले आवाजाला कसा प्रतिसाद देतात, याकडे नीट लक्ष द्यावे. आवाजानंतर त्या दिशेने पाहतात की नाही, याकडे लक्ष द्यावे.


जाणून घ्या कानाच्या समस्या व कारणे