बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव सर्वजण मिळून लोकोत्सव म्हणून साजरा करुया -पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

Lets all celebrate the centenary golden jubilee birth anniversary of Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj as Lokotsav


By nisha patil - 6/17/2024 8:14:57 PM
Share This News:



 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव सर्वजण मिळून लोकोत्सव म्हणून उत्साहाने साजरा करुया, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्याचबरोबर शाहू जन्मस्थळ विकासाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 15 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल, तसेच या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती कार्यक्रमासाठीही जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यकतेनुसार निधी देण्याबरोबरच शासनाकडून निधी मिळवण्यासाठीही प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

 

 राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती महोत्सवांतर्गत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होणार आहेत. या जयंती उत्सवाचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्ह्यातील खासदार व लोकप्रतिनिधींच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात बेठक घेण्यात आली. बैठकीला खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक तसेच विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, पुरोगामी विचारांनी महान कार्य केलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे इतिहासातील अद्वितीय व्यक्तिमत्व आहेत. शाहू महाराजांचे विचार व त्यांचे कार्य जिल्ह्यासह राज्य व देशभरात पोहोचवण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी 26 जून या त्यांच्या जयंती दिनी, तसेच या सप्ताहात व या वर्षभरात विविध उपक्रमांचे व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 

 

या उत्सवात शाहू महाराजांच्या विचार व कार्यावर आधारित 150 व्याख्याने, परिसंवाद, दिंडी, पदयात्रा, शोभायात्रा, शाहू महाराजांनी उभारलेल्या विविध वास्तू, संस्था, ऐतिहासिक ठिकाणांचे जतन व संवर्धन, वृक्षारोपण, निबंध व वक्तृत्व स्पर्धा यासह विविध कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 येत्या 26 जून रोजी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे शाहू जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे शाहू महाराज छत्रपती व खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले.

 

 खासदार धनंजय महाडिक यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांचे विचार विद्यार्थी व युवकांमध्ये रुजवण्यासाठी शालेय व महाविद्यालयीन स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत आवाहन केले. 

 

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 15 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद व्हावी, असे आवाहन आमदार प्रकाश आवाडे यांनी केले, त्यास सर्व लोकप्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. 

 

जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला वेगळी ओळख आहे. शाहू महाराजांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती वर्षानिमित्त शाहू महाराजांच्या विचार व कार्याचा वारसा सर्वदूर पोहोचविण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील प्रत्येक भागांत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

 

ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार म्हणाले, शाहू जन्मस्थळ विकासासाठी निधीची तरतूद होण्यासाठी जिल्ह्यातील खासदार व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा. राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने 2 हजार आसन क्षमतेचे सभागृह शहरात तयार होण्यासाठी प्रयत्न व्हावेत. शाहू महाराजांचे विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी वर्षभर मार्गदर्शनपर कार्यक्रम घ्यावेत.

 

मुंबईमध्ये शाहू महाराजांचे स्मारक, वस्तुसंग्रहालय व विद्यार्थी वसतीगृह होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, शाहू महाराजांची जयंती लोकोत्सव म्हणून साजरी व्हावी, जन्मस्थळाची कामे लवकर पूर्ण व्हावीत, असे आवाहन वसंतराव मुळीक यांनी केले. 

 

     शाहू महाराजांच्या या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न व्हावेत, यावर्षभरात शाहू महाराजांनी उभारलेल्या व शाहूकालीन वास्तूंची दुरुस्ती, सुशोभीकरण व स्वच्छता मोहीम राबवावी, 150 ठिकाणी वृक्षारोपण व्हावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घ्यावा, आंतरराष्ट्रीय पातळीवर शाहू महाराजांचे विचार व कार्य पोहोचवण्यासाठी व्याख्यानमालांचे आयोजन करावे, शाहू महाराजांच्या कार्यावर आधारित चित्ररथ जिल्हा व राज्यभरात फिरावा, 26 जून रोजी भव्य मिरवणूक काढून यात जिल्ह्यातील अधिकाधिक नागरिकांचा सहभाग घ्यावा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, असे आवाहन उपस्थित शाहू प्रेमींनी केले.


राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती उत्सव सर्वजण मिळून लोकोत्सव म्हणून साजरा करुया -पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन