बातम्या

कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक ऐतिहासिक करूया......

Lets make Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti procession historic in Kagal


By nisha patil - 8/2/2024 7:52:08 PM
Share This News:



कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक ऐतिहासिक करूया......
          
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्त्यांच्या नियोजन मेळाव्यात आवाहन
          
१९ फेब्रुवारीला मिरवणूक, पारंपारिक वाद्यांसह भगव्या वादळाचा लोकोत्सव

               
कागल, दि. ८: कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी सोमवार दि. १९  फेब्रुवारीला होणारी मिरवणूक ऐतिहासिक करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यादिवशी कागल नगरीमध्ये भगवे वादळ अवतरेल आणि जल्लोषी मिरवणुकीसह पारंपारिक वाद्यांचा लोकोत्सव होईल, असेही ते म्हणाले.
                  
कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या लोकोत्सवानिमित्त आयोजित कार्यकर्त्यांच्या नियोजन मेळाव्यात पालकमंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते.
                       
भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, कागलमधील बसस्थानकाजवळचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा अजूनही मोठा असावा, अशी शिवप्रेमींमधून मागणी आहे. त्या चबुतऱ्यावर  छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवीन भव्य- दिव्य अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारू आणि या नवीन पुतळ्याला  पुढच्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला अभिषेक करूया, असेही ते म्हणाले. येत्या आठवडाभर कागल, गडहिंग्लज व उत्तुर विधानसभा मतदारसंघात "शिवनोकरी  महामेळावा" व पक्षाच्यावतीने जिल्हास्तरावर "स्वराज्य सप्ताहा"चे आयोजन करणार असल्याचेही ते म्हणाले.
                  
सामानगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार.....!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ऐतिहासिक महत्त्व असलेल्या सामानगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती भव्य- दिव्य असा पुतळा उभारणार. हा पुतळा उभारण्याची जबाबदारी मी स्वतः घेईन.
            
सोमवार दि. १९  फेब्रुवारी रोजी होणारे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे कार्यक्रम असे.......
सकाळी नऊ वाजता:  निपाणी वेस येथे छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ श्री. शिवज्योतीचे आगमन व स्वागत. सकाळी दहा वाजता: शिवज्योतीसह निपाणी वेशीतील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून  मुख्य बाजारपेठेतून बस स्थानकाजवळच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक. सकाळी  साडेअकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा;  कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्ध व जलाभिषेक. दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी श्री. शिव जन्मकाळ सोहळा व पाळणा. त्यानंतर कागल नगरपालिकेसमोर श्री. शिवप्रेमींचा मेळावा. सायंकाळी सहा वाजता: पारंपारिक वाद्ये व मर्दानी खेळांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून मुख्य  बाजारपेठेतून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत मिरवणूक व आतषबाजी.
                 
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विकास पाटील, विजय काळे, प्रवीण काळबर यांची मनोगते झाली.
                    
यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, शशिकांत खोत, नवीद मुश्रीफ, वसंतराव धुरे, नितीन दिंडे, संजय फराकटे, संजय ठाणेकर, रावसाहेब खिलारी, संजय चितारी, रवींद्र पाटील, प्रवीणसिंह भोसले, बाळासाहेब तुरंबे, आर. व्ही. पाटील,  बळवंतराव माने, संदीप भुरले, जयदीप पोवार, अर्जुन नाईक, राजेंद्र माने, नारायण पाटील, सागर गुरव, डी. एम. चौगुले, जीवनराव शिंदे, सौ. शितल फराकटे, अमित पिष्टे, लखन पालकर, सागर दावणे, शशिकांत नाईक, सुनील माळी, असलम मुजावर, मनोजभाऊ फराकटे, रमेश तोडकर आदी प्रमुख उपस्थित होते.
................
            
कागल: कागलमध्ये १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या नियोजनाच्या पूर्वतयारीसाठी आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व समोर उपस्थित.


कागलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक ऐतिहासिक करूया......