बातम्या
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करुया-जिल्हाधिकारी अमोल येडगे
By nisha patil - 2/3/2024 12:35:19 PM
Share This News:
पोलिओ निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना रविवार दिनांक 3 मार्च 2024 रोजी पोलिओ डोस देण्यात येणार आहे. या अनुषंगाने आपल्याकडे येणा-या शासकीय कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करावे व पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व विभागांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
पोलिओ निर्मुलनासाठी नियमित लसीकरणांतर्गत सर्व पात्र बालकांचे वेळेत लसीकरण करणे, संशयित पोलिओ रुग्णांचा शोध घेऊन त्याचे निदान करणे व 0 ते 5 वयोगटातील बालकांना अतिरिक्त पोलिओ डोस देणे ही त्रिसुत्री आहे. पर्यटन व जागतिकीकरणामुळे पोलिओ विषाणू पसरण्याची शक्यता असल्यामुळे 0 ते 5 वयोगटातील बालकांसाठी पोलिओचे दोन थेंब महत्त्वाचे आहेत. अगदी बाळ नुकतेच जन्मलेले असले तरी पोलिओ डोस द्यावयाचा आहे.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यामध्ये ग्रामीण, शहरी तसेच महानगरपालिका विभागांतर्गत मागील तीन मोहिमेतील अहवालानुसार जिल्ह्यामध्ये 0 ते 5 वयोगटातील अंदाजित 3 लाख 7 हजार बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी ग्रामीण व शहरी मिळून 2 हजार 268 लसीकरण केंद्राची तसेच 654 मोबाईल टीम, 390 ट्रान्झीट टीमची स्थापना करण्यात आलेली आहे. 3 मार्च नंतर ग्रामीण भागात 3 दिवस व शहरी भागात 5 दिवस घरभेटीचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी 3 हजार 65 आयपीपीआय टीमद्वारे घरभेटीद्वारे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत सर्व बालकांना पोलिओ लस दिल्याची खात्री करण्यात येणार आहे व वंचित लाभार्थ्यांना तात्काळ पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व बाजारहाट गर्दीची ठिकाणे, धार्मिक स्थळे, बस स्थानके, टोल नाके व रेल्वे स्टेशन्स या ठिकाणी सुद्धा ट्रान्झीट टीम व दुर्गम भागातील वाड्यावस्त्यावरील भटक्या जमाती, ऊस तोडणी मजूर यांच्या मुलांना मोबाईल टीमद्वारे पोलिओ डोस देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 100 टक्के यशस्वी करुया-जिल्हाधिकारी अमोल येडगे
|