बातम्या

सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांचा जीवन प्रवास: हिम्मत आणि कष्टांतून यशाची प्राप्ती

Life Journey of Retired Subedar Muralikant Petkar aka Chandu Champion


By nisha patil - 12/1/2025 11:38:55 PM
Share This News:



सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांचा जीवन प्रवास: हिम्मत आणि कष्टांतून यशाची प्राप्ती

हिंमत आणि प्रामाणिकपणे कष्ट केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येते, सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन

आयुष्यात पदोपदी आव्हानांचा डोंगर पार करावा लागतो. त्यासाठी प्रचंड आत्मविश्वास, हिम्मत आणि प्रामाणिकपणे कष्ट करण्याची तयारी असावी लागते. हे गुण आत्मसात केल्यास जीवनात निश्चितच यशस्वी होता येईल, असा विश्वास सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांनी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्यावतीनं आयोजित कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केला.

सेवानिवृत्त सुभेदार मल्लिकांत पेटकर आणि त्यांचे सुपुत्र सेनादलातील अर्जुन पेटकर यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांच्या पुढाकारातून अनोख्या उपक्रमाचं आयोजन केले होते. मूळचे पेठ, इस्लामपूर इथले रहिवासी आणि सद्या पुण्यात स्थायिक असलेल्या सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांचा संवाद कार्यक्रम हॉटेल वृषाली इथं पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात रोटरीच्या प्रार्थनेने आणि राष्ट्रगीताने झाली. रोटरीचे माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. रोटरीच्या रमेश खटावकर यांनी सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर यांच्या कार्याचा आणि शौर्याचा उपस्थितांना परिचय करून दिला. दरम्यान पेटकर यांच्या जीवनावरील चित्रफितीचे सादरीकरण करण्यात आले. त्यामुळे उपस्थितांना गहिवरून आले. त्यांचे चिरंजीव आणि सैन्य दलातील अधिकारी अर्जुन पेटकर यांनी वडिलांचा संपूर्ण जीवन प्रवास उलगडून दाखवला. वयाच्या दहाव्या वर्षापासून आज ८४ वयापर्यंतच्या कालावधीत मुरलीकांत पेटकर यांनी जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या माध्यमातून मरणालाही मागे सारले. प्रत्येक ठिकाणी यश खेचून आणले.

अशक्य गोष्टीही त्यांनी शक्य करून दाखवल्या. त्यामुळेच राज्य आणि केंद्र शासनाने त्यांच्या कार्याची दाखल घेतल्याचेही अर्जुन पेटकर यांनी सांगितले. दरम्यान चंदू चॅम्पियन या चित्रपटातील काही भाग या उपक्रमादरम्यान स्क्रीनद्वारे दाखवण्यात आला. युद्धात अपंगत्व येऊन देखील या करारी व्यक्तिमत्वान हार मानली नाही. दिव्यांगत्व प्राप्त झाले असताना देखील त्यांनी विविध स्पर्धात देशासाठी ४७६ मेडल्स खेचून आणली. इतकेच काय तर शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त या महनिय, पदमश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्वाचा आता अर्जुन ऍवॉर्डने राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. हे व्यक्तिमत्व निश्चितच सर्वांसाठी प्रेरणास्थान आहे. देश सेवा करताना प्राण पणान लढणार्‍या या व्यक्तिमत्त्वाचा रोटरीच्या वतीन सन्मान करण्याचे भाग्य प्राप्त झाल्याचेही रोटरी क्लब कोल्हापूर मिडटाऊनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक यांनी सांगितले. देशातील सर्वांसाठी अखंड ऊर्जेचा स्त्रोत असलेल्या सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर या व्यक्तिमत्वामुळे कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील खेळाडूंना ऊर्जा प्राप्त होणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा निकराने सामना करा. वाट्याला आलेले प्रत्येक काम हिमतीने करा, शारीरिक व्यंग प्राप्त झाले तरी, बौद्धिक व्यंग स्वीकारू नका. बुद्धी चातुर्यान सर्वांवर मात करा, यश तुमचेचं असेल असा विश्वास देखील मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांनी उपस्थितांना दिला.

त्यांच्या तोंडून त्यांचा जीवन प्रवास ऐकताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. तसेच सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले. अशा या व्यक्तिमत्त्वाचा रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिडटाउनच्या अध्यक्षा सौ. अरुंधती महाडिक, सेवानिवृत्त कमांडंट शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन तसेच अर्जुन पेटकरांना नासिर बोरसादवाला यांच्या हस्ते गौरवण्यात आले. दरम्यान पॅरा पिस्टल शूटिंग चॅम्पियन जानकी मोकाशी यांनी दिव्यांगांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. त्यासाठी आपण सहाय्य करू असे आश्वासन अर्जुन पेटकर यांनी दिले. दरम्यान शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या नलिनी डवर-मेढे-पवार, थलेटिक थ्रो क्रीडा प्रकारातील गोल्ड मेडलिस्ट जयश्री शिंदे या सर्वांच सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांनी कौतुक केले. यावेळी रोटरीचे रमेश खटावकर, बी.एस. शिंपूकडे, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट मनीषा चव्हाण, सेक्रेटरी ज्योती तेंडुलकर, मिडटाऊनचे शरद पाटील, अवधूत अपराध यांच्यासह राेटरी परिवाराचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सेवानिवृत्त सुभेदार मुरलीकांत पेटकर उर्फ चंदू चॅम्पियन यांचा जीवन प्रवास: हिम्मत आणि कष्टांतून यशाची प्राप्ती
Total Views: 51