विशेष बातम्या
संभाजीनगरला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप
By nisha patil - 1/6/2023 6:55:00 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहराला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यावर अखेर आज न्यायालयाने निकाल सुनावला आहे. आज जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी संकेत जायभायला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील संकेतचे इतर साथीदार असलेल्या तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
23 मार्च 2018 रोजी कामगार चौकाजवळ भररस्त्यात संकेत कुलकर्णी नावाच्या तरुणाच्या अंगावर प्रेम प्रकरणावरून पाच ते सहा वेळा वार करून, चिरडून त्याची हत्या करण्यात आली होती. भर दुपारी साडेतीन ते चार वाजता घडलेल्या या घटनेने छत्रपती संभाजीनगर शहर हादरून गेले होते. संकेत कुलकर्णी याला कारखाली चिरडल्यानंतर आरोपी संकेत जायभाय घटनास्थळावरून त्याच्या साथीदारासह पळून गेला होता. त्यानंतर संकेतला त्याच्या सोबतच्या मित्रांनी जखमी अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले होते. विशेष म्हणजे ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी संकेत जायभाये याच्यासह त्याचे साथीदार संकेत मचे, उमर पटेल आणि विजय जोग यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती. पुढे पोलिसांनी त्यांच्याविरोधात न्यायालयात खटला भरला होता. मुकुंदवाडी पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपींविरोधात न्यायालयात आरोप पत्र दाखल केले होते. शहराला हादरून टाकणाऱ्या या खून प्रकरणात शासनाने विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून न्यायालयात यावर सुनावणी सुरु होती. तर सरकारी पक्षाने 22 साक्षीदार तपासले होते.
दरम्यान, या खटल्याची सुनावणी न्यायमूर्ती डी. एच. केळुसकर यांच्या समोर नुकतीच पूर्ण झाली होती आणि न्यायालयाने निकाल राखीव ठेवला होता. तर यावर आज निकाल देतांना न्यायालयाने मुख्य आरोपी संकेत जायभायला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर या प्रकरणातील संकेतचे इतर साथीदार असलेल्या तिघांना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. ॲड. निकम यांना जिल्हा सरकारी वकील अविनाश देशपांडे, ॲड. सिद्धार्थ वाघ यांनी साहाय्य केले. तसेच बचाव पक्षाच्या वतीने ॲड. राजेश काळे, ॲड. नीलेश घाणेकर, ॲड. भाले, ॲड. दळवी यांनी बाजू मांडली होती.
संभाजीनगरला हादरवून टाकणाऱ्या संकेत कुलकर्णी खून प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप
|