बातम्या
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता, विदर्भात वादळी पावसाचा इशारा
By nisha patil - 3/18/2025 5:42:42 PM
Share This News:
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता, विदर्भात वादळी पावसाचा इशारा
राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपासूनच उष्णतेच्या लाटांनी जोर धरला आहे. मुंबई आणि कोकण भागात उष्णतेसह दमट हवामानाचा फटका बसत असताना, विदर्भात गेल्या आठवड्याभरापासून उष्णतेच्या तीव्र लाटांनी नागरिक हैराण झाले आहेत. अनेक ठिकाणी तापमान 40 अंशांच्या पुढे गेले होते.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आता विदर्भातील उष्णतेच्या लाटा कमी होत असून, पुढील दोन दिवसांत (21 आणि 22 मार्च) वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात 40 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
तसेच, बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या वाऱ्यांचा आणि मध्य भारतातील वाऱ्यांच्या एकत्रित प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिमी चक्रावाताचा प्रभाव छत्तीसगड आणि विदर्भाच्या काही भागांवर जाणवणार आहे.
या हवामान बदलांचा शेतीसह दैनंदिन जीवनावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलक्या पावसाची शक्यता, विदर्भात वादळी पावसाचा इशारा
|