बातम्या

मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची दुकाने 18 ते 20 मे 2024 पर्यंत बंद राहणार -निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव

Liquor Sale in Mumbai North East Constituency


By nisha patil - 5/17/2024 11:47:51 PM
Share This News:



लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे. 28- मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात 18 मे  रोजी (सायंकाळी सहा वाजेपासून) ते 20 मे 2024 रोजी मतदानसंपेपर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी ड्राय डे (कोरडा दिवस) जाहीर करण्यात आला आहे. मतदारसंघातील सर्व अनुज्ञप्त्या बंद ठेवण्यात येणार आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक डॉ. सुनील यादव यांनी दिले आहेत.

            मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील कार्यालयात आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामकाज आढावा बैठक झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. यादव यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

मतदारसंघात 55 गुन्हे6 लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त

            मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण 55 गुन्हे दाखल करण्यात आले असुन 56 आरोपीनां अटक करण्यात आले आहेत. दोन लाख 23 हजार 925 रूपयांची 647.29 लिटर दारू जप्त करण्यात आली आहे. चार लाख 50 हजाराचे एक वाहन जप्त करण्यात आले आहे, असे एकूण सहा लाख 73 हजार 925 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्यविक्री करणाऱ्या व्यक्तीविरोधात  प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांच्याकडून नऊ लाख 40 हजार इतक्या रकमेचे बंधपत्र घेण्यात आले आहे. गोडाऊन, वाईन शॉप, परमिट रुम, देशी दारूचे गोडाऊन, देशी बार अशा एकूण 348 मद्याच्या अनुज्ञप्तीवर सी.सी.टी.व्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली असल्याची माहितीही यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दातकर यांनी दिली.

अवैध मद्याबाबत तक्रारीसाठी 18002339999 टोल फ्री क्रमांक

             मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात सहा गस्ती पथक कार्यरत असून, त्या पथकांच्याकडून अवैध मद्यविक्री, अवैध वाहतुक व अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर बंद करण्याबाबत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दैनंदिन तसेच रात्री गस्त घालण्यात येते. विभागाकडून नोंदविण्यात आलेल्या गुन्हा अन्वेषण कामकाजाची माहिती ईएसएमएस ॲपवर अद्ययावत करण्यात येते. अवैध मद्याबाबत तक्रार असल्यास संपर्क साधण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांकावर अथवा 8422001133 हा व्हॉट्सॲप क्रमांक कार्यान्वित करण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक सत्यवान गवस तथा मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघ संपर्क अधिकारी यांनी सांगितले.


मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघातील मद्य विक्रीची दुकाने 18 ते 20 मे 2024 पर्यंत बंद राहणार -निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. सुनील यादव