आपटे वाचन मंदिराचे साहित्यकृती पुरस्कार जाहीर

Literary Award of Apte Vachan Mandir announced


By nisha patil - 5/29/2023 7:00:29 AM
Share This News:



इचलकरंजी : प्रतिनिधी  येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी आपटे वाचन मंदिराच्या वतीने देण्यात येणारे सन २०२२ मधील उत्कृष्ट साहित्यकृतीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये प्रतिष्ठेचा इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार मंगसुळी (कर्नाटक) येथील कवी आबासाहेब पाटील यांच्या ‘घामाची ओल धरून’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनी ग्रंथालयास दिलेल्या देणगीमध्ये भर घालून ग्रंथालयाच्या वतीने त्या वर्षामध्ये प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट काव्यसंग्रहास हा पुरस्कार देण्यात येतो.डॉ. अशोक सौंदत्तीकर यांनी दिलेल्या निधीतून सौ. आशाताई सौंदत्तीकर उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार दिला जातो. तो या वर्षी विद्या पेठे, विलेपार्ले (मुंबई), यांच्या ‘कथा मनातल्या-जनातल्या’ या कथासंग्रहाला जाहीर झाला आहे. या वर्षीपासून विवेक देशपांडे यांनी दिलेल्या निधीतून विनायकराव श्रीधर देशपांडे उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार दिला जाणार आहे. तो या वर्षी वसंत लिमये (पुणे) यांच्या ‘टार्गेट असद शाह’ या कादंबरीला जाहीर झाला आहे.भारतीय लेखकांच्या अन्य भाषेतील साहित्यकृतीच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट अनुवादासाठीचा महादेव बाळकृष्ण जाधव अनुवादित साहित्यकृती पुरस्कार दिला जातो. तो या वर्षी डॉ. जयंत नारळीकर, मुंबई, अनुवाद पुष्पा खरे, पुणे यांच्या ‘ताऱ्यांची जीवनगाथा’ या अनुवादास जाहीर झाला आहे. ग्रंथालयाचे माजी अध्यक्ष वि. प. जगदाळे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला जातो.कै. वसंतराव दातार यांच्या स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून ‘ऐहिकाच्या भृगजळात’ या पूजा भडांगे (पुणे) यांच्या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. तसेच कै. सुलभा मगदूम यांच्या स्मरणार्थ लक्षणीय काव्यसंग्रह म्हणून ‘ऐन विणीच्या हंगामात’ या पुनीत मातकर (मेटिखेडा- यवतमाळ) यांच्या काव्यसंग्रहाची निवड करण्यात आली आहे. लक्षणीय गद्य साहित्यकृतीसाठी प्राक् सिनेमा (अरुण खोपकर-मुंबई) व पृथ्वीचे आख्यान (अतुल देऊळगावकर) यांची निवड करण्यात आली आहे. या वर्षीपासून अॅड. मुकुंद अर्जुनवाडकर, जयसिंगपूर यांनी दिलेल्या निधीतून कै. वसुंधरा मुकुद अर्जुनवाडकर यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट ललित गद्य साहित्यकृती पुरस्कार दिला जाणार आहे. त्यासाठी या वर्षी विश्वास वसेकर (पुणे) यांच्या ‘जगण्याचा उत्सव’ या साहित्यकृतीची निवड झाली आहे. पार्वती शंकरराव तेलसिंगे उत्कृष्ट बाल साहित्यकृती पुरस्कारासाठी विनोद गायकर (मुंबई) यांच्या वेणूच्या गोष्टी (भाग १ ते ४) या साहित्यकृतीची निवड झाली आहे. डॉ. श्रीरंग तेलसिंगे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार दिला जातो. या वर्षीपासून दादासो जगदाळे यांनी दिलेल्या निधीतून रागिणी दादासो जगदाळे यांच्या स्मरणार्थ युवा पद्मरत्न पुरस्कार दिला जाणार आहे. तो या वर्षी विनायक होगाडे (इचलकरंजी) यांच्या ‘डियर तुकोबा’ या साहित्यकृतीची निवड झाली आहे. अॅड. स्वानंद मुकुंद कुलकर्णी यांनी दिलेल्या निधीतून कै. मुकुंद विठ्ठल कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ स्थानिक साहित्यिक पुरस्कार दिला जाणार आहे. तो या वर्षी सुभाष काडाप्पा यांना देण्यात येणार आहे. उत्कृष्ट वाचक पुरस्कार प्रेमा खंजिरे यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरणाची तारीख लवकरच जाहीर केली जाणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली. ....‘गान गुणगान -एक सांगीतिक यात्रा’ उत्कृष्ट गद्य साहित्यकृतीइचलकरंजी साहित्य संमेलन स्मृती ट्रस्ट यांच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृती पुरस्कार पुणे येथील सत्यशील देशपांडे यांच्या ‘गान गुणगान-एक सांगीतिक यात्रा’ या गद्य साहित्यकृतीस जाहीर झाला आहे. १९७४ साली महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्‍व पु. ल. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखालील साहित्य संमेलनात स्मृती ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून दरवर्षी त्या वर्षातील उत्कृष्ट मराठी गद्य साहित्यकृतीस हा पुरस्कार देण्यात येतो.


आपटे वाचन मंदिराचे साहित्यकृती पुरस्कार जाहीर