बातम्या
आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे सकारात्मक दृष्टीने पहा
By nisha patil - 2/11/2023 7:46:26 PM
Share This News:
आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे सकारात्मक दृष्टीने पहा
-‘दि डेटा टेक लॅब्स’चे सीईओ डॉ. अमित आंद्रे यांचे आवाहन
-‘मिशन रोजगार’ अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान
कसबा बावडा/ वार्ताहर आर्टिफिशल इंटेलिजन्स(एआय) अर्थात कृत्रिम बुद्धीमत्तेकडे (एआय) सकारात्मक दृष्टीकोनातून पाहणे आवश्यक आहे. एआय मानवाची जागा कधीच घेऊ शकत नाही. उलट एआयचा चांगला वापर करून मानव वेळेची बचत करून अचूक पद्धतीने काम करू शकतो. पुढील दहा वर्षात या क्षेत्रात मोठी संधी असून त्याचा विद्यार्थांनी फायदा घ्यावा, असे आवाहन ‘दि डेटा टेक लॅब्स’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित आंद्रे यांनी केले. मिशन रोजगार व कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर अंतर्गत ‘आर्टिफिशल इंटेलिजन्स व करियरच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते.
आमदार सतेज डी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘मिशन रोजगार’ अंतर्गत ५ व ६ नोव्हेंबर रोजी जॉब फेअर चे आयोजन करण्यात आले आहे‘मिशन रोजगार’ अंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या सभागृहात आयोजीत या व्याख्यानावेळी नॅस्कॉमचे विभागीय प्रमुख सचिन म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट डायरेक्टर डॉ. अजित पाटील यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ विषयी माहिती दिली. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यामध्यमातून विद्यार्थी, युवकांसाठी रोजगार निर्मितीसाठी सातत्यने उपक्रम राबविले जात आहेत. साळोखे नगर येथील कोल्हापूर इन्क्युबेशन सेंटर मध्ये सुरु असलेल्या २१ वेगवेगळ्या स्किल लर्निंग कोर्सेसच्या माध्यमातून आजवर ५ हजार १०० जणांनी लाभ घेतल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. अमित आंद्रे यांनी यांनी आर्टिफिशल इंटेलिजन्स म्हणजे काय हे सांगून भविष्यात काय बदल होतील याविषयी माहिती दिली. एआय बद्दलचे अनेक गैरसमज त्यांनी दूर केले. बँक, ऍटोमोबाइल, हेल्थ केअर, सोशल मीडिया, मनोरंजन, शिक्षण अशा विविध घटकांसाठी आर्टिफिशल इंटेलिजन्सचा फायदा होणार आहे. एआय ही एक सर्वव्यापी संकल्पना असून आज सर्व क्षेत्रात त्याची गरज आहे. केवळ इंजिनीअर नव्हे तर प्रत्येक क्षेत्रातील लोकांनी याचा वापर कसा करवा हे जाणून घेणे गरजेचे आहे. रोबोटिक सायंटिस्ट, बिग डेटा सायंटिस्ट, बी.आय. डेव्हलपर, डेटा सायंटिस्ट, एम.एल.इंजिनिअर, प्रॉडक्ट मॅनेजर, एआय रिसर्च सायंटिस्ट अशा अनेक क्षेत्रात या माध्यमातून करिअरच्या मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. आंद्रे यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन केले. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांनी ‘मिशन रोजगार’ अंतर्गत रोजगाराची सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे, त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करता त्यांनी विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळावी यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विभाग प्रमुख अभिजित मटकर, डेप्युटी रजिस्ट्रार आश्विन देसाई यांच्यासह मिशन रोजगार अंतर्गत नोंदणी केलेले विद्यार्थी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कसबा बावडा: विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अमित आंद्रे, उपस्थित विद्यार्थी.
आर्टिफिशल इंटेलिजन्सकडे सकारात्मक दृष्टीने पहा
|