बातम्या
प्रत्येक युगात भगवान श्रीगणेशानेही 8 अवतार घेऊन केला दुष्टांचा नाश
By nisha patil - 9/19/2023 7:12:29 AM
Share This News:
धर्म शास्त्रानुसार श्रीगणेशाने प्रत्येक युगात वेगवेगळ्या रुपामध्ये अवतार घेतले आहेत. मुद्गल पुराणानुसार भगवान गणेशाचे अनेक अवतार आहेत. ज्यामध्ये आठ अवतार प्रमुख मानले जातात. प्रत्येक युगात निर्माण झालेल्या राक्षसांचा संहार करण्यासाठी गणपतीने हे अवतार घेतले आहेत. हे आठ अवतार मनुष्यातील आठ प्रकारच्या दोषांना काम, क्रोध, मद, लोभ, मत्सर, मोह, अहंकार आणि अज्ञानाला दूर करणारे आहेत. कथांच्या आधारावर तुम्ही स्वतः ठरवू शकत की, गणपतीच्या कोणत्या अवतारामुळे कोणत्या दोषाचा नाश होतो.
एकदंत
गणेशाचा एकदंतावतार देही-ब्रह्माचा धारक आहे, तो मदासुराचा वध करणारा आहे. त्याचे वाहन मूषक सांगितले गेले आहे. मदासूर नावाचा दैत्य होता. तो महर्षी च्यवनाचा पुत्र होता. एके दिवशी त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांची भेट घेऊन म्हणाला, ‘‘मला शिष्य म्हणून स्वीकारा. मी संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी होऊ इच्छितो. ती पूर्ण होण्यासाठी मार्गदर्शन करावे.’’ शुक्राचार्यांनी शिष्यत्व दिले. त्यानंतर शक्तिमंत्र दिला. त्यानंतर मदासूर तप करण्यासाठी अरण्यात गेला. त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवती प्रसन्न झाली. ब्रह्मांडनायक होण्याचे वरदान दिले. त्यानंतर मदासुराने पृथ्वीवर साम्राज्य स्थापन केले. नंतर स्वर्गावर चढाई केली. इंद्राचा पराभव केला. सर्वत्र असुरांचे क्रूर शासन सुरू झाले. पृथ्वीवरील धर्म-कर्म संपून गेले. चहूकडे हाहाकार माजला.
चिंतातूर देवगण सनत्कुमाराजवळ गेले. असुरांच्या विनाशाचा उपाय विचारला. सनत्कुमार म्हणाले, ‘‘देवगण हो, श्रद्धापूर्वक एकदंताची उपासना करा. ते संतुष्ट होऊन मनोकामना पूर्ण करतील.’’ देवतांच्या उपासनेने मूषक वाहनावरील एकदंत प्रकटले. त्याच्यासमोर देवतांनी विनवणीपूर्वक मदासुराचा वध करण्यास सांगितले. दवर्षींनी हा निरोप मदासूरापर्यंत धाडला. क्रोधित मदासूर युद्धासाठी निघाला. धनुष्यावर बाण चढवणार इतक्यात तीव्र परशूचा घाव लागला. तो जमिनीवर कोसळला. सावध झाल्यानंतर पाहतो तर परमात्माच समोर..मदासुराने हात जोडले. क्षमा मागितली. त्याला अभयदान देत एकदंत म्हणाले, ‘‘ज्या ठिकाणी माझी पूजा-आराधना होते, त्या ठिकाणी येऊ नकोस. आजपासूनच तू पाताळात वास्तव्यास जा.’’ जशी आज्ञा म्हणत मदासूर पाताळात गेला. देवगण एकदंताचा जयजयकार करीत स्वर्गलोकी निघून गेले.
वक्रतुंड
भगवान श्रीगणेशाचा ‘वक्रतुंडावतार’ ब्रह्मरूपाने संपूर्ण शरीरांना धारण करणारा, मत्सरासुराचा वध करणारा तसेच सिंहासनावर आरूढ होणारा आहे. प्रथम अवतार वक्रतुंडाचा. त्याची कथा अशी : देवराज इंद्राच्या प्रमादामुळे मत्सरासुराचा जन्म झाला. त्याने दैत्यगुरू शुक्राचार्यांपासून शिवाच्या पंचाक्षरी मंत्राची (ओम नम: शिवाय) दीक्षा प्राप्त केली.
शंकराकडून अभयदानाचे वरदान मिळवले. त्यानंतर तो दैत्यांचा राजा झाला. मंत्रांनी विश्वविजयी होण्याचा सल्ला दिला. आक्रमणे करून त्याने भूतलावर, स्वर्गलोकी राज्य मिळवले. देव दु:खी झाले. त्याच वेळी दत्तात्रेय आले. त्यांनी देवतांना वक्रतुंडाच्या एकाक्षरी मंत्र (गं)चा उपदेश केला. त्याने वक्रतुंड प्रगट झाले. असंख्य गणांसह मत्सरासुराशी युद्ध केले. वक्रतुंडाच्या भयानक रूपापुढे मत्सरासुराचा पराभव झाला. देवगण वक्रतुंडाचे गुणगान करू लागले.
श्री गजानन
देवगणांचे कोशाध्यक्ष कुबेर कैलासाला गेले. तेथे त्यांनी शिव-पार्वतीचे दर्शन घेतले. भगवती उमाच्या अनुपन सौंदर्याकडे एकटक पाहू लागले. त्याने देवी क्रोधित झाली. कुबेर भयभीत झाले. त्याच्या भीतीपासून लोभासूर उत्पन्न झाला. तो अत्यंत प्रतापी आणि बलवान होता. तो शुक्राचार्यांकडे गेले. त्याच्या आदेशाने वनात तपश्चर्येसाठी गेला. तेथे पंचाक्षरी मंत्राचा जप करू लागला. भगवान शंकराच्या प्रसन्नतेसाठी घोर तपश्चर्या सुरू केली. शेवटी शिव प्रकटले. त्रैलोक्यात निर्भय होण्याचा वर दिला. निर्भय झालेल्या लोभासूराने त्रैलोक्यावर चढाई करून स्वत:चे साम्राज्य निर्माण केले. पराभूत झालेल्या इंद्राने भगवान विष्णूकडे धाव घेतली. विष्णू असुरांचा संहार करण्यासाठी गरूडावर स्वार होऊन आले. परंतु शंकराच्या वरामुळे त्यांनाही पराभूत व्हावे लागले. लोभासूराच्या उन्मादाने भगवान शंकरालाही ललकारले. शंकरालाही दिलेल्या वरदानाची आठवण झाली आणि ते कैलासाचा त्याग करून निघाले. रैभ्य मुनींच्या सांगण्यावरून देवतांनी गणेश उपासना सुरू केली. प्रसन्न होऊन गजानन प्रकटले. खुद्द भगवान शंकर आणि शुक्राचार्याने गजाननाची महती सांगून त्यांच्यापुढे शरण जाण्यास सांगितले. लोभासूराने गणेशतत्त्वाला समजून घेतले आणि त्याच्या चरणी लीन झाला.
महोदर
गणेशाचा महोदर अवतार ज्ञान-ब्रह्मचा प्रकाशक आहे. त्याने मोहासुराच्या विनाशासाठी जन्म घेतला. मोहासूर दैत्यगुरू शुक्राचार्याचा शिष्य. त्याने सूर्याची आराधना केली. सूर्यदेव प्रसन्न झाले. सर्वत्र विजयी होण्याचे वरदान दिले. त्यानंतर तो त्रैलोक्याचा अधिपती झाला. देवगण आणि मुनिगण अरण्यात लपून बसले. सूर्याकडे जाऊन या भयानक विपत्तीतून मुक्त करण्याचा उपाय विचारला. सूर्यदेवाने त्यांना एकाक्षर मंत्र देऊन गणेशाला प्रसन्न करण्याची प्रेरणा दिली. देव व मुनिगण भक्तिपूर्वक महोदराची उपासना करू लागले. त्याने संतुष्ट होऊन महोदर प्रकटले. मोहासुराचा वध करण्याचे वचन देऊन त्यांना निश्चिंत राहण्यास सांगितले. मूषकावर सवार झालेले महोदर मोहासुराशी युद्ध करण्यासाठी निघाले. देवर्षींनी हा समाचार मोहासुरापर्यंत पोहोचवला. शुक्राचार्य, भगवान विष्णू यांनी मोहासुराला सल्ला दिला की महोदराला शरण जावे. त्यांच्या सल्ल्याने मोहासुराचा अहंकार नष्ट झाला. त्याने भगवान विष्णूंना सांगितले, ‘भगवंत, महोदरांना आपल्या नगरीत पाचारण करून त्यांचे दर्शन मिळवून द्यावे.’ भगवान महोदर मोहासुराच्या नगरीत आले. त्यांचे अभूतपूर्व स्वागत झाले. भक्तिपूर्वक पूजा झाली. त्यानंतर मोहासूर म्हणाला, ‘अज्ञानाला वश झाल्यामुळे माझ्याकडून अपराध झाला. क्षमा करा. कोणत्याही धर्माचरणात विघ्ने आणणार नाही.’ महोदरांनी त्याला क्षमा केले. त्यानंतर त्रैलोक्यात शांतता प्रस्थापित झाली.
प्रत्येक युगात भगवान श्रीगणेशानेही 8 अवतार घेऊन केला दुष्टांचा नाश
|