बातम्या

अलमट्टीसंदर्भात पंतप्रधानांसोबत तातडीची बैठक लावावी- आमदार अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

MLA Amal Mahadik demands an urgent meeting with the Prime Minister regarding Almaty


By nisha patil - 12/20/2024 12:29:19 AM
Share This News:



अलमट्टीसंदर्भात पंतप्रधानांसोबत तातडीची बैठक लावावी- आमदार अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा सामना करावा लागत आहे.

या महापुरामुळे जीवित हानी आणि वित्तहानी मोठ्या प्रमाणात होत असते. दरवर्षी उद्भवणाऱ्या महापुराच्या संकटाला कर्नाटकातील अलमट्टी धरण बऱ्याचअंशी कारणीभूत आहे अशी दोन्ही जिल्ह्यातील पूरग्रस्तांची धारणा आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये अलमट्टीतून होणाऱ्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून जोरदार प्रयत्न केले जातात.अलमट्टी धरणामुळे पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. ही बाब ध्यानात घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी या संस्थेला तांत्रिक अभ्यास करून उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले होते.

या संस्थेचा अहवाल येण्यास अजून अवकाश असताना कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. धरणाची उंची 519.60 मीटर वरून524.60 मीटर करण्यासाठी भूसंपादन सर्वेक्षण आणि तांत्रिक अहवाल प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. वास्तविक अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासंदर्भातला वाद सर्वोच्च न्यायालयाच्या लवादाकडे प्रलंबित आहे.

तरीही कर्नाटक शासनाने उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. संपादित केलेल्या जमिनींना योग्य मोबदला देण्याशी मागणीही कर्नाटक विधिमंडळात करण्यात आली आहे.
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याला महाराष्ट्र शासनाचा विरोध असूनही कर्नाटक सरकारने आडमुठेपणाने चालवलेल्या या प्रक्रियेची तातडीने दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत बैठक घ्यावी अशी मागणी आमदार अमल महाडिक यांच्यासह आमदार चंद्रदीप नरके, आमदार अशोकराव माने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. भविष्यात महापुराचे संकट उद्भवल्यास त्या संकटाला कर्नाटक सरकार जबाबदार असेल त्यामुळे लवकरात लवकर ही बैठक घेऊन तोडगा काढावा अशी विनंतीही या आमदारांनी केली.

 

होणाऱ्या जीवित आणि वित्तहानीचा विचार करून पंतप्रधानांसमवेत त्वरित बैठक घेऊन या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
यावेळी आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, अशोकराव माने यांच्यासह सम्राट महाडिक आणि राहुल महाडिक उपस्थित होते.


अलमट्टीसंदर्भात पंतप्रधानांसोबत तातडीची बैठक लावावी- आमदार अमल महाडिक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी