बातम्या

गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा : आमदार जयश्री जाधव

MLA Jayashree Jadhavs true service is to put a smile on the face of the poor


By neeta - 5/2/2024 4:54:25 PM
Share This News:



कोल्हापूर : आरोग्य सेवा देणे आणि गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा आहे असे मत आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी व्यक्त केले.जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन व भारती विद्यापीठ आयुर्वेदिक रुग्णालय कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य शिबिर व आधार कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी भारती विद्यापीठ आयुर्वेदिक रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिनंदन मुके होते. जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. दश्मिता सत्यजित जाधव, सर्जेराव साळोखे प्रमुख उपस्थित होते. 

सम्राटनगर येथील जिव्हेश्वर भवनमध्ये आयोजित शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, निरोगी शरीर हिच खरी माणसांची संपत्ती आहे. लोकं आयुष्यभर काबाडकष्ट करून पैसे मिळवतात. मात्र आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करतात. त्यांना भविष्यात होणाऱ्या वैद्यकीय त्रासावर वेळ उपचार व्हावेत यासाठीच आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे.डॉ. दश्मिता जाधव म्हणाल्या, महिला विविध क्षेत्रात काम करते तेव्हा तिला कुटुंबा सोबत मुलांसोबत अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतात. हे सर्व करण्यासाठी तिला मानसिक व शारीरिक समतोल असणे खूप गरजेचे आहे, तरच ती उत्कृष्टपणे काम करू शकते. यासाठी महिलांनी आपल्या मानसिक व शारीरिक आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

भारती विद्यापीठ आयुर्वेदिक रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिनंदन मुके यांनी निरोगी शरीर आणि आनंदी जीवनाचा मंत्र दिला.
या शिबीरात सुमारे चारशे रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यांना मोफत वैद्यकीय मार्गदर्शन व उपचार करण्यात आले. तसेच ५५७ नागरिकांचे आयुष्यमान भारत कार्ड नोंदणी करण्यात आली.डॉ. रेश्मा भोसले, डॉ. अनघा किणींगे, तेजश्री भोसले, समृद्धी खाडे, पुनम कुंभार यांच्यासह तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांमार्फत रुग्णांची तपासणी करण्यात आली.

सुनेना बनसोडे, मनीषा सांगावकर, राधिका घुरके, राधिका गायकवाड, स्मिता कांबळे, तेजश्री पाटील, प्राजक्ता कुऱ्हाडे, निशा कांबळे, रेखा केळुसकर, सारिका शिर्के, सुनिता कांबळे यांच्या पथकाने आयुष्यमान भारत कार्डची नोंदणी केली. डॉ. स्वाती देसाई यांनी आभार मानले.


गरिबांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हीच खरी सेवा : आमदार जयश्री जाधव