राजकीय
"मित्र" संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती
By nisha patil - 6/3/2025 7:21:08 PM
Share This News:
"मित्र" संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती
मुंबई, दि. ६: महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या "उपाध्यक्ष" पदावर आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाने "मित्र" संस्थेची स्थापना नीती आयोगाच्या धर्तीवर राज्याच्या सर्वसमावेशक व जलद विकासासाठी केली आहे.
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष असलेले आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह आमदार दिलीप वळसे पाटील आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचीही "मित्र" संस्थेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी संस्थेच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तर सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची नियुक्ती झाली होती.
मित्र संस्थेच्या कार्याची दिशा
राज्याच्या अर्थव्यवस्थेला २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर आणि २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलर पर्यंत पोहोचविण्याचे ध्येय ठरवण्यात आले आहे. त्यासाठी जागतिक बँक, नाबार्ड, नीती आयोग यांच्यासह विविध आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने Maha STRIDE, सौर ऊर्जा प्रकल्प, शाश्वत विकास परिषद यांसारखे महत्त्वाचे उपक्रम राबवले जात आहेत.
पूरनियंत्रण प्रकल्पाची पुढची पायरी
यासंदर्भात बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले की, "मित्र संस्थेच्या माध्यमातून कोल्हापूर व सांगली पूरनियंत्रण प्रकल्पासाठी ३७०० कोटींचा जागतिक बँकेचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि हा प्रकल्प प्रगतीपथावर आहे." तसेच राज्यातील मुख्य शहरे विकसित करण्यासाठी इंटरनॅशनल फायनान्स कॉर्पोरेशनच्या सहकार्याने नव्या योजना राबवण्यात येणार आहेत, ज्यामध्ये कोल्हापूरचा समावेश असेल.
राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध
"माझ्या फेरनियुक्तीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचे आभार मानतो. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझे प्रयत्न सुरू राहतील," असे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
"मित्र" संस्थेच्या उपाध्यक्षपदी आमदार राजेश क्षीरसागर यांची फेरनियुक्ती
|