बातम्या

आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक

MLA Rituraj Patil's rangna trek with youth


By nisha patil - 5/2/2024 9:58:39 PM
Share This News:



आमदार ऋतुराज पाटील यांनी आपल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील १८ ते २५ वयोगटातील युवक-युवतींसमवेत रांगणा किल्ला  ट्रेक पूर्ण केला. या ट्रेकमध्ये मतदार संघातील २५२ युवक युवती सहभागी झाले होते. यामध्ये ४४ युवतींचा समावेश होता.सह्याद्रीच्या डोंगर रांगातील हा ट्रेक सहभागी युवा पिढीला छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची आणि शौर्याची प्रेरणा देणारा ठरला. 
    

रविवारी झालेल्या या ट्रेकची सुरुवात आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करुन  झाली. तांब्याचीवाडी, भटवाडी, चिक्केवाडी या मार्गावरुन रांगणा किल्यापर्यंत हा ट्रेक झाला. सह्याद्रीच्या डोंगर रांगातील झाडे-झुडपे तसेच चढ-उतार यातून कडक उन्हामध्ये मार्ग क्रमण करताना सहभागी युवक युवती घामाच्या धारांमध्ये न्हावून निघाल्या. तरुणाईने सळसळत्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे यांचा जयघोष केला. हा जयघोष सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये दुमदुमला. शिवभक्तीच्या गाण्यांनी एक वेगळीच उर्जा सहभागी युवापिढीच्या अंगात संचारली. आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह युवापिढीला हा अनुभव उर्जा देणारा ठरला. या ट्रेकच्या मार्गावर आमदार ऋतुराज पाटील यांनी चिक्केवाडी येथील शिंदे कुटूंबियांशी आपुलकीने संवाद साधला. 
    

आमदार पाटील यांच्या हस्ते विधीवत गड पुजन होताना सहभागी तरुणाईने शिवछत्रपतींचा जयघोष केला. रांगणा किल्ला येथे श्री रांगणाई देवीचे आमदार पाटील यांनी दर्शन घेतले. त्यानंतर सहभागी ट्रेकर्स बरोबर जेवणही घेतले. या संपूर्ण ट्रेकमध्ये आमदार पाटील यांनी युवक-युवतींशी साधलेल्या आपुलकीच्या दिलखुलास संवादाने सर्वजण भारावून गेले. 
इतिहास अभ्यासक राम यादव यांनी रांगणा किल्यावरील वाड्यामध्ये  किल्ल्याची माहिती व इतिहास सांगितला.

 

आमदार ऋतुराज पाटील यांनी संवाद साधताना सांगितले की, छत्रपती शिवरायांच्या शौर्याची, साहसाची साक्ष देत सह्याद्रीच्या डोंगररांगात उभ्या असणाऱ्या दुर्गम किल्यांची जपणूक करणे हे आपली सर्वांचे कर्तव्य आहे.  रांगणा किल्ला ट्रेक हा उर्जादायी अनुभव असल्याचे त्यांनी नमूद केले. शिवाज्ञा गडकोट संस्थेच्या सदस्यांनी सहकार्य केले. गडाच्या परिसरात कचरा होऊ नये याची काळजी सहभागी ट्रेकर्सनी घेतली.


आमदार ऋतुराज पाटील यांचा युवापिढी सोबत रांगणा ट्रेक