बातम्या

केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची खासदार महाडिक यांनी घेतली भेट

MP Mahadik met the Union Culture Minister Gajendra Singh


By nisha patil - 10/8/2024 11:40:35 AM
Share This News:



गुरुवारी रात्री झालेल्या अग्नी  तांडवात कोल्हापुरातील संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह बेचिराख झाले. त्यामुळे कोल्हापूरच्या कलाविश्वाला मोठा हादरा बसला आहे. शाहूकालीन ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृह आणि त्याचबरोबर शाहू खासबाग मैदानातील व्यासपीठ आणि छत पूर्णपणे उध्वस्त झाले आहे. या अग्नितांडवाची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांना दिली. सध्या संसदेचे अधिवेशन सुरू असल्यामुळे, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक नवी दिल्लीत आहेत. 

गुरुवारी रात्री केशवराव भोसले नाट्यगृह जळून खाक झाल्यानंतर, खासदार महाडिक यांनाही धक्का बसला. आज त्यांनी तातडीने केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांची भेट घेतली आणि कोल्हापुरातील या दुर्घटनेची माहिती देऊन,  स्थानिक कलाकार आणि नागरिकांची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवली. सन 1915 साली अस्तित्वात आलेल्या त्यावेळच्या पॅलेस थिएटरची उभारणी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केली. पुढे 1957 मध्ये या नाट्यगृहाचे संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे नामकरण झाले. गेल्या शंभर वर्षापेक्षा अधिक काळ कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह म्हणजे कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ आणि ऊर्जा स्त्रोत आहे. मात्र गुरुवारच्या दुर्घटनेमुळे हा ऐतिहासिक कला ठेवा नष्ट झाला आहे. 

अशावेळी हे नाट्यगृह पुन्हा तातडीने उभारणे आवश्यक आहे, अशी भूमिका खासदार महाडिक यांनी केंद्रीय सांस्कृतिक मंत्री नामदार शेखावत यांच्यासमोर मांडली. त्यासाठी राज्य सरकार पावले उचलेलंच, परंतु केंद्रीय पातळीवरही सुसज्ज, आधुनिक आणि कोल्हापूरच्या परंपरेला साजेसे नाट्यगृह उभारण्यासाठी भरीव आर्थिक निधी मिळावा, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली.

 कोल्हापुरातील सर्व कलाकार रंगकर्मी आणि नागरिकांच्या मतांचा आदर करून आणि त्यांच्या भावना विचारात घेऊन, ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाचे पुनरूज्जीवन केले जाईल, त्याला केंद्र सरकारने संपूर्ण सहकार्य करावे, अशी अपेक्षा खासदार महाडिक यांनी व्यक्त केली. त्याला केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी तत्काळ सकारात्मक सहमती दर्शवली.

 


केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांची खासदार महाडिक यांनी घेतली भेट