बातम्या
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाला सुरुवात...
By nisha patil - 8/29/2024 2:44:43 PM
Share This News:
विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता बैठक होणार आहे. या बैठकीला मविआचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत जागावाटपावरुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मुंबईतील जागावाटपात ठाकरेंची शिवसेनाच मोठा भाऊ राहणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी सकारात्मक असल्याची माहिती आहे.
मुंबईतील जागा मेरिटनुसार लढण्यावर मविआच्या नेत्यांमध्ये एकमत झाले आहे. मुंबईत ठाकरेंची शिवसेना 20 ते 22 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. काँग्रेसचा 13 ते 15 जागांवर तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 5 ते 7 जागांवर दावा सांगितला आहे.सध्याच्या माहितीनुसार, मुंबईत ठाकरे गटाला अधिक जागा देण्याबाबत काँग्रेस आणि शरद पवार गट सकारात्मक असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत मुंबईसाठीचा हा फॉर्म्युला सर्वानुमते मान्य होणार का, हे बघावे लागेल. कारण, मुंबईतील जागावाटप ठरल्यानंतरच मविआच्या राज्याच्या इतर भागांमधील जागावाटपाला सुरुवात होणार आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एकूण 30 जागा जिंकल्या होत्या. तर सांगली मतदारसंघातून काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील निवडून आले होते. मविआच्या एकूण 30 जागांपैकी काँग्रेसला 13, ठाकरे गटाला 9 आणि 8 जागांवर शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले होते. लोकसभा निवडणुकीतील कामगिरीमुळे काँग्रेस आणि शरद पवार गटाचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस जास्त जागांसाठी आग्रही राहणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या सगळ्यातून मविआचे नेते कसा मार्ग काढणार, हे बघावे लागेल.
विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागावाटपाला सुरुवात...
|