बातम्या

बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४

Mahavitaran Abhay Yojana 2024 for 3 8 lakh consumers disconnected due to bill arrears


By nisha patil - 8/30/2024 9:56:52 PM
Share This News:



बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरुपी तोडलेल्या राज्यातील ३८ लाख घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४ अंमलात येणार असून ग्राहकांना वीजबिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण १७८८ कोटी रुपये माफ करण्यात येतील. 
 

मा. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी १ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी केले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीजबिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्या ऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्राहकांनी चिंतामुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.

 

राज्यातील महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. या ३८ लाख ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ५०४८ कोटी रुपयांची रक्कम तसेच १७१९ कोटी रुपये व्याज आणि ६९ कोटी ९० लाख रुपये विलंब आकार येणे आहे. तथापि, या वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी थकित बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज आणि विलंब आकाराच्या स्वरुपातील दंड माफ करण्यात येईल. 
 

मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून ऊर्वरित ७० टक्के रक्कम सहा हफ्त्यात भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक इत्यादी लघुदाब ग्राहक एक रकमी थकित बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल. भिवंडी, मालेगाव, मुंब्रा, शीळ व कळवा या महावितरणच्या फ्रांचायजी क्षेत्रातील वीज ग्राहकांनाही ही योजना लागू होणार आहे.
असा लाभ घ्या

 

संबंधित वीज ग्राहकांना www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाईटवरून ऑनलाईन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाईल ॲपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल. त्याच पत्त्यावर योग्य पुरावे सादर करून नव्या नावाने वीज कनेक्शन घेण्याचीही सुविधा असेल.

 - मुख्य जनसंपर्क अधिकारी


बिलाच्या थकबाकीमुळे कनेक्शन तोडलेल्या ३८ लाख ग्राहकांसाठी महावितरण अभय योजना २०२४