बातम्या
महावितरण कर्मचाऱ्यांनी पूर स्थिती योग्य प्रकारे हाताळली
By nisha patil - 8/16/2024 7:32:21 PM
Share This News:
महावितरण कर्मचाऱ्यांनी पूर स्थिती योग्य प्रकारे हाताळली
प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांचे आढावा बैठकीत कौतुक
काम करताना ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवण्याचे निर्देश
कोल्हापूर / सांगली : दिनांक 16 ऑगस्ट 2024 : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेली पूर स्थिती हि महावितरण कर्मचाऱ्यांनी योग्य पद्धतीने हाताळली आहे. २४ तास सतर्क राहत, पुराचा आढावा घेत, योग्य वेळी पुरवठा बंद केल्याने वीज यंत्रणेमुळे कोठेही अनुचीत घटना घडली नाही. तसेच ग्राहकांचा बंद झालेला वीज पुरवठा हा होडीने, पोहत जाऊन प्रसंगी जीव धोक्यात घालून पूर्ववत केला आहे. एकूणच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर स्थिती महावितरण अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक हाताळली असल्याचे दिसून येते, असे मत महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर परिमंडल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कार्यकारी अभियंते यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, सांगली मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता धर्मराज पेटकर, सहाय्यक महाव्यवस्थापक(वित्त) विजय गुळदगड, सहाय्यक महाव्यवस्थापक(मानव संसाधन) शशिकांत पाटील, उपमुख्य औद्योगिक सबंध अधिकारी शिरीष काटकर, सर्व विभागाचे कार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना खंदारे पुढे म्हणाले, ‘पूर परिस्थितीत केलेल्या कामावरून कर्मचाऱ्यांची ग्राहक सेवेप्रती असलेली बांधिलकी यातून दिसून येते. हीच बांधिलकी नियमित काम करतानाही जपण्याचे निर्देश त्यांनी दिले. वीज ग्राहकांना अखंडित सेवा देण्यास आपण बांधील असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले, नवीन जोडणी देताना विहित नियमांचे पालन करत वेळेत जोडणी द्या, रोहित्र खराब झाल्यास ते कमीत कमी कालावधीत बदला, रोहित्र खराब होण्याचे प्रमाण शून्य होईल याकरता प्रयत्न करा, ग्राहकांना वेळेत व योग्य रीडिंग घेऊन बिल द्या, बिल रीडिंगचे फोटो सुस्पष्ट येण्याच्या दृष्टीने सबंधित एजन्सीना सूचना द्या, ग्राहकांना माहिती मिळण्याच्या दृष्टीने, वीज पुरवठा बाधित होत असेल तर त्याची माहिती सबंधित यंत्रणेत नोंदवा, वीज बिल तक्रारी तात्काळ सोडवा, थकबाकीदार व वीज चोरांवर नियामानुसार कारवाई करा, वीज हानी कमी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
विविध योजनांचे लाभ ग्राहकांपर्यंत पोहचवा
ग्राहकांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या सोलर पंप - कुसुम बी योजना, पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना , मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना आदी योजनांची माहिती ग्राहकांपर्यंत पोहचवा. या योजनांचे ग्राहकांना अधिकाधिक लाभ मिळेल याकरता प्रयत्न करा. विविध योजनांचे ग्राहकांना केंद्र सरकार कडून लवकरात लवकर अनुदान मिळेल याकरता प्रयत्नशील रहा, अशा सूचनाही खंदारे यांनी दिल्या. यावेळी कोल्हापूर परिमंडल कार्यालयाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांनी कोल्हापूर परिमंडल अतर्गत सुरु असलेल्या विविध कामांची व योजनांची माहिती दिली.
महावितरण कर्मचाऱ्यांनी पूर स्थिती योग्य प्रकारे हाताळली
|