बातम्या

कंबरदुखीची मुख्य कारणे व त्याच्यावर उपाय

Main causes of back pain and its remedies


By nisha patil - 7/20/2023 7:38:21 AM
Share This News:



बदलत्या जीवनशैलीने माणसाला वेगवेगळे आजार प्रदान केले आहेत. डोकेदुखीबरोबरच कंबरदुखी हा त्यापैकीच एक आजार आहे. अलीकडे तरुणवर्गातही ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसू लागली आहे.

सतत बैठे काम करणे, पुरेशी शारीरिक हालचाल नसणे, चुकीच्या पद्धतीने उठणे-बसणे, पोषक आहाराचा अभाव, वाढते वजन यांसारख्या कारणांमुळे कंबरदुखीची समस्या वाढत असल्याचे दिसते. मात्र या त्रासावर नियंत्रण आणणे तितकेसे अवघड नाही. योग्य जीवनशैली, पुरेसा व्यायाम, संतुलित आहार आणि शरीराला योग्य शिस्त लावली तर या त्रासावर नियंत्रण मिळवणे सहजशक्य आहे. कंबरदुखी ही अलीकडच्या काळातील सामान्य समस्या बनू लागली आहे. अधिक वय असलेल्या व्यक्तींमध्येच ही समस्या दिसून येत नाही तर तरुणांमध्येदेखील ही समस्या वाढत असल्याचे दिसत आहे. खास करून संगणकावर सतत बसून काम करणा-या, शारीरिक व्यायाम अधिक नसलेल्या तरुण वर्गामध्ये ही समस्या वेगाने वाढत आहे. कंबरदुखीची नेमकी कारणे कोणती आणि तिच्यापासून दूर कसे राहता येईल याबाबत जाणून घेऊया.

आपला पाठीचा मणका ३२ हाडांनी बनलेला असतो. यामधील २२ हाडे सक्रिय भूमिका निभावत असतात. या हाडांच्या गतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होतो तेव्हा कंबरदुखीची समस्या सुरू होते. मणक्याच्या हाडांव्यतिरिक्त आपल्या कंबरेच्या बनावटीत कार्टिलेज, डिस्क, सांधा, स्नायू आणि लिगामेंट इत्यादींचा समावेश असतो. यापैकी कुठल्याही भागाला कुठल्याही प्रकारचा त्रास निर्माण झाला म्हणजे कंबरदुखी सुरू होते.

कंबरदुखीमुळे उभे राहणे, वाकणे, वळणे यांसारख्या क्रिया करताना खूप त्रास होतो. सुरुवातीलाच याबाबत उपचार केले नाहीत तर ही समस्या अधिक गंभीर रूप घेऊ शकते. मात्र वेळेवर उपचार केल्यास त्रास कमी करता येतो.

शरीराची उठण्या-बसण्याची पद्धत योग्य नसेल तर मणक्याच्या हाडाची संरचना बदलते आणि यामुळे कंबरेच्या खालच्या भागात, मानेमध्ये वेदना सुरू होतात. कंबरदुखीपासून स्वतःचा बचाव करायचा असल्यास नेहमी कंबर सरळ आणि मागच्या बाजूला करून बसावे. शरीराचा भार दोन्ही हिप्सवर बरोबर असला पाहिजे.

प्रत्येक ३० मिनिटांनंतर आपली बसण्याची स्थिती बदलली पाहिजे. खुर्चीवर बसल्यानंतर दोन्ही पाय जमिनीवर सरळ करावेत. उभे राहताना छातीबाहेर आणि पोट आतल्या बाजूला असावे. कंबर सरळ आणि गुडघे वाकलेले नसावेत. दीर्घकाळ एकाच स्थितीत उभे राहणे टाळावे. आपली उभे राहण्याची आणि बसण्याची पद्धत योग्य असेल आणि शारीरिकदृष्ट्या आपण योग्य प्रकारे सक्रिय असू तर कंबरदुखीची समस्या नक्कीच दूर राखता येते.


कंबरदुखीची मुख्य कारणे व त्याच्यावर उपाय