बातम्या
आरोग्य मंत्र : निरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार
By nisha patil - 8/1/2024 7:40:38 AM
Share This News:
आरोग्य मंत्र : निरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार
हृदयविकारास अनेक घटक कारणीभूत असतात. संतुलित आहार राखणे निरोगी हृदययासाठी गरजेचे असते. हृदयविकार आटोक्यात ठेवण्यासाठी तुमच्या जीवनशैलीत तुम्हाला कायमस्वरुपी बदल करावे लागतील. अनुवंशिकता, वाढणारे वय, अनियंत्रित धूम्रपान, उच्चरक्तदाब, लठ्ठपणा, वाढलेले वजन, रक्तातील चरबीचे प्रमाण, व्यायामाचा अभाव, बैठे काम, मधुमेह, मानसिक ताण हृदयविकारास कारणीभूत ठरतो.
संतुलित आहार का घ्यायचा?आहारात स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते, तेव्हा त्यातून अधिक प्रमाणात उष्मांक मिळतो. ते वापरले गेले नाहीत तर शरीरात साठविले जातात. त्यामुळे वजन, चरबी, रक्तदाब वाढतो. त्यातून हृदयविकार असणाऱ्यांना अधिक त्रास होतो. त्यामुळे स्निग्ध पदार्थ टाळणे हा सर्वोत्तम मार्ग आहे. यासाठी योग्य आहार ठेवावा.
असा असावा आहार
भात, पोळी, भाकरी आदी योग्य प्रमाणात असावे. फळे, भाज्या आणि पालेभाज्या भरपूर प्रमाणात घ्याव्यात. तेलकट पदार्थ अतिशय कमी प्रमाणात असावेत. कोलेस्टेरॉल मेणासारखा स्निग्ध पदार्थ असतो. ते रक्तात वाढतो त्यावेळी रक्तवाहिन्यांच्या अंत:त्वचेखाली त्याचे थर साचतात. परिणामी रक्तप्रवाह अवरूद्ध होतो. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी प्रयत्न करावे. साय, लोणी, मटण, पामतेल, खोबरेल तेलात स्निग्ध पदार्थ जास्त असतात. त्यावर नियंत्रण ठेवावे. मांसाहार कमी ठेवावा. आठवड्यातून दोन ते तीनवेळा मासे खाल्ले तर चालतात. दूध, दुधाचे पदार्थ कमी करावे. डालडा तुपाचे सेवन टाळावे. कमी प्रमाणात सुकामेवा घ्यावा. शिजविलेल्या पदार्थांपेक्षा उकडलेले, वाफविलेले पदार्थ घ्यावेत. बेकरीचे पदार्थ टाळावे. आहारात जास्त अंडी घेऊ नये. फारच क्वचित मांसाहार करावा. तृणधान्ये आणि मोड आलेली कडधान्ये भरपूर खावी. सोयाबीन आणि त्यापासून तयार केलेले पदार्थ खावेत.वजन कमी करण्यासाठी...
तुमचे वजन कमी होईल अशा पद्धतीचाच आहार निवडा. एकदम वजन कमी करू नये. त्यामुळे नुकसानच होते. कोलेस्टेरॉल कमी करणाऱ्या आहारापासून सुरुवात करावी. आहारातून जास्त उष्मांक देणारे पदार्थ पूर्ण वर्ज्य करावे. तेल, तूप, लोणी, राय, दाणे, खोबरे, तीळ, मध, मांस, जाम, शीतपेय अत्यंत कमी प्रमाणात घ्यावेत. शक्यतो रोज व्यायाम करावा. नियमित चालावे. हा सर्वांना जमणारा 'स्वस्त आणि मस्त' व्यायाम आहे. पळणे, पोहणे, सायकल चालविणे आदी व्यायामही करावे.
आरोग्य मंत्र : निरोगी हृदयासाठी ठेवा संतुलित आहार
|