बातम्या

फुटबॉल खेळामध्ये जाधव कुटुंबाचे मोठे योगदान शाहू महाराज : फुटबॉल संघांना किटचे वितरण

Major contribution of Jadhav family to the game of football Shahu Maharaj  Distribution of kits to football teams


By nisha patil - 2/22/2024 4:29:19 PM
Share This News:



फुटबॉल खेळामध्ये जाधव कुटुंबाचे मोठे योगदान
शाहू महाराज : फुटबॉल संघांना किटचे वितरण

कोल्हापूर : फुटबॉल स्पर्धेच्या निमित्ताने दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांचे फुटबॉलवरील प्रेम मी पाहिले आहे. प्रत्येक खेळाडूंना त्यांचा मोठा आधार होता. आण्णांचा वारसा आमदार जयश्री जाधव व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत. कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रातील जाधव कुटुंबाचे योगदान मोठे आहे असे मत छत्रपती शाहू महाराज यांनी व्यक्त केले.

कोल्हापूर शहरातील सोळा वरिष्ठ (सीनियर) फुटबॉल संघातील खेळाडूंना जाधव इंडस्ट्रीज, एफसी कोल्हापूर सिटी व जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने फुटबॉल किटचे वितरण दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
 

फुटबॉलच्या मैदानावर एकमेकांच्या विरोधात खेळणारे सर्व खेळाडू आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्रित आले. या फुटबॉल संघाचे अध्यक्ष, पदाधिकारी, प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि खेळाडू यांचा स्नेह मेळावा महाराणी लॉन येथे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या प्रतिमेचे पुजनाने झाली.
 

शाहू महाराज म्हणाले, कोल्हापूरच्या फुटबॉलला राजाश्रय बरोबर लोकाश्रय मिळाला आहे. लोकाश्रयमध्ये दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचे नाव अग्रभागी आहे. फुटबॉल मध्ये त्यांची उणीव सातत्याने जाणवते, हीच त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. आमदार सतेज पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या फुटबॉल आणि क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. कोल्हापूरचा फुटबॉल आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे, यासाठी दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव (आण्णां) यांची नेहमी धडपड होती. प्रत्येक फुटबॉल संघाचे स्वतंत्र सराव मैदान असावे यासाठी ते प्रयत्नशील होते. कोल्हापुरातील मैदानाच्या सर्वांगीण विकासासाठीचे प्रस्ताव आण्णांनी तयार करून घेतले आणि निधीसाठी मंत्रालयात पाठपुरावा करत होते. फुटबॉलच्या माध्यमातून कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या आण्णांच्या निधनाने क्रीडा क्षेत्राची झालेली हानी कधीही न भरून निघणारी आहे.
 

कोल्हापूर शहराच्या वैभवात भर टाकणारे महावीर गार्डन, हुतात्मा पार्क, शाहू मिल अशा विविध प्रकल्पाचे आराखडे आण्णांनी तयार केले होते. या प्रकल्पाच्या माध्यमातून आण्णांच्या स्मृती निरंतर जपल्या जातील असा विश्वास आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला. 
 

आमदार जयश्री जाधव म्हणाल्या, फुटबॉल म्हणजे अण्णांचा जीव की प्राण. फुटबॉल हा शब्द जरी कानावर पडला तरी आता अण्णांच्या आठवणीने डोळे पाणावतात.  आण्णा गेले तेव्हा अनेकांनी कोल्हापूरचा फुटबॉल पोरका झाला अशा भावना व्यक्त केल्या होत्या. पण कोल्हापूरचा फुटबॉल कधीही पोरका होणार नाही. जाधव कुटूंबीय कायमपणे फुटबॉल संघ व खेळाडूच्या पाठिशी खंबीरपणे राहणार आहे. आजपर्यंत अण्णांनी ज्या प्रकारे फुटबॉल खेळाडू व संघांना मदतीचा हाच दिला, त्याचप्रमाणे आम्हीही सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू. 

अण्णांची खेळ आणि खेळाडूंच्या वरती प्रेम होते. त्यांच्या कार्याचा वारसा आमदार जयश्री जाधव वहिनी व सत्यजित जाधव समर्थपणे पुढे नेत आहेत, ही बाब अभिमानास्पद आहे असे मत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी व्यक्त केले. 

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस औद्योगिक सेलचे सचिव व युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव म्हणाले, आण्णा खेळाडू होते. त्यांनी सर्वच खेळांना प्रोत्सहन दिले. क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले पाहिजे, यासाठी आण्णा सदैव प्रयत्नशिल होते. आण्णांचे हे काम पुढे नेण्यासाठी मी कटिबध्द आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, शिवसेनेचे शहरप्रमुख सुनिल मोदी, चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष संजय शेटे, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता जाधव, प्रेमला पंडितराव जाधव, बाळासाहेब नचिते, आशिष पवार, उदयराव पैठणकर, संदीप पवार, कपिल मोहिते, रोहन शिंदे  आदी उपस्थित होते.

यावेळी पाटाकडील तालीम मंडळ- अ, श्री शिवाजी तरुण मंडळ, बालगोपाल तालीम मंडळ, खंडोबा तालीम मंडळ-अ, दिलबहार तालीम मंडळ-अ, संयुक्त जुना बुधवार पेठ, संध्यामठ तरुण मंडळ, सम्राटनगर स्पोर्ट्स, फुलेवाडी फुटबॉल क्रिडा मंडळ, प्रॅक्टीस फुटबॉल क्लब-अ, झुंजार क्लब, पाटाकडील तालीम मंडळ- ब, उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ,  बी. जी. एम. स्पोर्टस्, वेताळमळ तालीम मंडळ-अ, वर्षा विश्वास तरुण मंडळ, सोल्जर स्पोर्ट्स या सोळा संघांना व रेफ्री असोसिएशनला फुटबॉल किटचे वितरण करण्यात आले.


फुटबॉल खेळामध्ये जाधव कुटुंबाचे मोठे योगदान शाहू महाराज : फुटबॉल संघांना किटचे वितरण