बातम्या
शाश्वत विकासासाठी माणसाने स्वतःमध्ये बदल करावा. शहाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय चर्चासत्रात वक्त्यांचा सूर
By nisha patil - 3/16/2024 7:48:35 PM
Share This News:
कोल्हापूर: शाश्वत विकाससाठी माणसाने स्वतःमध्ये बदल करावा, जमीन, पाणी, ऊर्जा,पर्यावरण यांचा समतोल आणि संतुलित वापर करावा. आपल्या हव्यासासाठी आणि आरामासाठी पर्यावरणातील विविध घटकांचा बेसुमार वापर करू नये, अन्यथा याचे परिणाम आपल्या सह पुढच्या पिढीला भोगावे लागतील, त्यांच्यासाठी खूप किंमत मोजावी लागेल, आपल्या स्वतःबरोबरच पुढील पिढीसाठी चांगले पर्यावरण, चांगले आरोग्य आणि कायमस्वरूपी विकास राहण्यासाठी युनेस्कोने सांगितलेली शाश्वत विकासाची 17 ध्येये अवगत करावीत,त्याची अंमलबजावणी स्वतःपासून करावी असे आवाहन शाश्वत विकासावरती काम करणाऱ्या तज्ञांनी केले.
दसरा चौक येथील शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या शहाजी छत्रपती महाविद्यालयात आज भारतातील शाश्वत विकास :धोरणे व नवीन प्रवाह या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रोपास जल अर्पण करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले.
शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता, प्रोफेसर डॉ. एस.एस.महाजन म्हणाले, साधन संपत्ती मर्यादित आहे, पुढील पिढीसाठी ती राखून ठेवणेही महत्त्वाचे आहे. आपला विकास करत असताना तो अघोरी पद्धतीने करू नये, घरातील केर कचरा बाहेर टाकून आपण चिरंतन विकास करू शकत नाही, घरातील पाणी कधीही शिळे होत नाही, ते रोज येणाऱ्या पाण्यापेक्षा अधिक स्वच्छ असते. पाणी कमी आणि लोकसंख्या जास्त असे चित्र आहे. त्यामुळे पाणी जपून वापरावे. ऊर्जा तयार करण्यासाठी कोळसा, पेट्रोल, डिझेल याचा वापर होतो.ते एक दिवस संपणारे आहे. म्हणून त्याचा जपून वापर करावा. रस्ते, महामार्ग बांधले की झाडांची कत्तल होते. यामध्ये केवळ झाडे नष्ट होत नाही तर त्यावरील सर्व प्रजाती आणि सर्व जैवविविधता धोक्यात येते. एडिसन ने असे सांगितले आहे की मधमाशी संपली तर चार वर्षात संपूर्ण मानव जात नष्ट होईल, मधमाशी अऩ निर्मितीच्या साखळीतील महत्त्वाचा घटक आहे.एक घटक संपला तर संपूर्ण जैवविविधतेला धोका होतो. त्यामुळे माणसाने शहाण्यासारख रहावे आणि स्वतःमध्ये बदल करून पाणी ऊर्जा जमीन याचा व्यवस्थित वापर करावा. तरच ती पुढील पिढीसाठी शाबूत राहील. अन्यथा आपणही नष्ट होऊ आणि पुढील पिढीला ही जगता येणार नाही.केवळ पैसा आणि भौतिक साधने म्हणजे विकास नाही,तर सुंदर आनंदी जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टीची अत्यावश्यकता आहे त्या असणे म्हणजे शाश्वत विकास होय.
ते म्हणाले की गरजेपेक्षा अधिक वस्तूचे उत्पादन आणि नैसर्गिक पर्यावरणामध्ये अडथळा निर्माण करणाऱ्या प्लास्टिक सारख्या वस्तूंची निर्मितीही घातक आहे. माणसाने आपल्यापासून सुरुवात करावी, आपल्या वर्तनात बदल करून पर्यावरण पूरक जीवन जगावे असे आवाहन त्यांनी केले.
बेळगाव येथील केएलई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड एज्युकेशन रिसर्चचे प्रोफेसर डॉ. पी.एम कुलकर्णी म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मध्ये खूप टॅलेंट आहे. नवनवीन कल्पना त्यांच्याकडे आहेत . परंतु त्या सत्यात उतरण्याची आवश्यकता आहे .वेगवेगळे उद्योग, व्यवसाय, व्यापार यामध्येही या कल्पनांचा वापर करणे गरजेचे आहे. टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, कचऱ्यावर प्रक्रिया करून उद्योग तयार करणे,खराब पाण्याचे शुद्धीकरण करून शेतीसाठी उपयोग करणे,कृत्रिम रित्या जंगल तयार करणे या अनेक गोष्टीतून व्यापार करता येईल, उद्योग करता येईल. शासनाची यासाठी धोरणे ही पूरक आहेत. परंतु त्याची स्वतःपासून व सर्वांनी एकत्रित अंमलबजावणी करण्याची गरज आहे.
शिवाजी विद्यापीठातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ,प्रोफेसर डॉ.ए.एम.गुरव म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ पदवी न घेता कौशल्यपूर्ण शिक्षण घ्यावे,निर्व्यसनी राहून चारित्र्यसंपन्न राहावे, आपले आरोग्य चांगले ठेवून नवनवीन कल्पनांचा स्वीकार करावा. चांगली कौशल्य आत्मसात करून विविध व्यवसायामध्ये प्रगती करावी. आजच्या दिवसापेक्षा उद्याचा दिवस आनंदी गेला पाहिजे यासाठी प्रयत्न आणि कष्ट करावेत. हे सर्व म्हणजे शाश्वत विकास आहे. चिरकाल टिकणारे आहे ते करावे म्हणजे शाश्वत विकास. ते म्हणाले जगात चांगल्या धडपडणाऱ्या मुलांना, विद्यार्थ्यांना खूप संधी आहे. योग्य मार्गाने त्यांनी वाटचाल करावी. शाश्वत विकासासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसांची आज समाजाला गरज आहे.उधळपट्टी आणि आईश अराम करणाऱ्यांचा शेवट लवकर येतो. शेवट लवकर होतो. यासाठी त्यांनी अनेक उदाहरणे आणि दाखले दिले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण यांनी या कार्यशाळेपाठीमागील भूमिका विषद केली. न्याक समन्वयक डॉ. आर.डी. मांडणीकर यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती दिली. स्वागत व प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. संतोष कांबळे यांनी केले. आभार डॉ. एम. ए. शिंदे यांनी मांनले. प्रोफेसर डॉ. व्ही. व्ही. मैंदुर्गी, डॉ. ए. जी. सूर्यवंशी, डॉ.व्ही.एस.शिरगुरे, प्रा. यु. ए. पाटील, डॉ. के.व्ही.मारुलकर, प्रा. श्रीकांत बच्चे, डॉ. एम. ए. कोळी यांनी मनोगते व्यक्त केली. संशोधक ,प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी यावेळी शाश्वत विकासावर संशोधन पेपर सादर केले. या संशोधन पेपरचे पुस्तकही यावेळी प्रकाशित करण्यात आले.
शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, मानद सचिव श्रीमती संगीता विजयराव बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के.शानेदिवाण यांचे या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी प्रोत्साहन मिळाले. विविध महाविद्यालयातील प्राध्यापक ,संशोधक, वाणिज्य शाखेतील अनेक विद्यार्थी या चर्चासत्रासाठी उपस्थित होते.
शाश्वत विकासासाठी माणसाने स्वतःमध्ये बदल करावा. शहाजी महाविद्यालयातील राष्ट्रीय चर्चासत्रात वक्त्यांचा सूर
|