बातम्या

मंडलिकांचे, छत्रपती शाहू महाराज यांना चर्चेसाठी निमंत्रण!

Mandalikas Chhatrapati Shahu Maharajs invitation for discussion


By nisha patil - 4/24/2024 5:11:59 PM
Share This News:



कोल्हापूर : महाराष्ट्रात लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर लोकसभेची निवडणूक सध्या वेगळ्या वळणावर आली असून,टीका. टिप्पणी न करता लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सामाजिक एकोप्याचे विचार, त्यांनी केलेली कृती, विकास कामे…आणि त्याचा आपल्याला लाभलेला वारसा याबाबत बोलण्यापेक्षा राजर्षींच्या गादीचा मान राखून आपण कोल्हापूरच्या विकासाच्या दृष्टीने काय पावले उचलली याचा लेखाजोखा आता मांडण्याची वेळ आली आहे. तेव्हा सातत्याने प्रवक्त्यांआडून वारसा न सांगता समोर या. जाहीरपणे कोल्हापूरचा विकास यावर थेट चर्चा करु, अशा शद्बात खासदार संजय मंडलिक यांनी कॉंग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज  यांना चर्चैचे आमंत्रण दिले.
शनिवारी दि. 27 एप्रिल रोजी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरात जाहीर सभा होणार आहे. त्यानुषंगाने भाजपच्या वतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर खास. मंडलिक  यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांचा समतेचा विचार दिल्लीत पोचवायला आम्ही देखील कटीबद्ध आहोत.

 

राजषीं शाहू महाराज ही आमची देखील अस्मिता आहे. ती आम्ही जपूच. पण अस्मिता जपताना आपल्या कर्तव्यात कुठे कसूर होणार नाही ना याचं भानही उमेदवारानं राखलं पाहिजे. पण नुसत्याच वारसा हक्काच्या वल्गना केल्या जातात, गादीच्या अपमानाचा कांगावा केला जातो. पण या गादीेचे प्रत्यक्ष जे उमेदवार आहेत त्यांनी गादीसाठी काय केलं…? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मंडलिक पुढे म्हणाले, संविधान वाचवण्यासाठी हाता ला साथ द्या अशी जनतेला साद घालणार्‍या उमेदवारांनी कोल्हापूरचा विकास होण्यासाठी आपण काय हातभार लावला हेदेखील स्पष्ट करणे गरजेचे आहे. शिवाय आम्ही शाहूंच्या गादीचे वारसदार आहोत असा टेंभा मिरवणारे श्रीमंत शाहू महाराज हे दत्तक आले आहेत. त्यामुळे जाहीर सभेत बोलताना उमेदवारांनी थोड भान राखून बोलावं. सातत्याने जनतेची दिशाभूल करु नये.
 

महाराजांनी वर्तमानात जगावं. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या विकासात्मक सुधारणा आणि त्यांचे समाजाप्रती असणारे योगदान न विसरता भारताला जगात तिसरी आर्थिक़ महासत्ता बनवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची वाटचाल सुरु आहे. राजर्षी शाहूंनी केलेल्या कामाचे श्रेय न घेता आपण स्वत: काय केले आहे किंवा भविष्यात विकासाबाबतच्या आपल्या योजना काय आहेत याबाबत सविस्तर विवेचन करणं सध्याच्या काळात आवश्यक आहे. लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने ही वेळ आता आली आहे. तेव्हा महाराज समोरा समोर या आपण देघेही विकास कामाबाबत थेट चर्चा करु, असे आमंत्रणही त्यांनी महाराजांना दिले.
 

एकंदरीत रोजच्या घडणाऱ्या घडामोडीनंतर एका नव्या वळणावर कोल्हापूर ची निवडणूक आली असल्याचे जानकारांनी सांगितले.


मंडलिकांचे, छत्रपती शाहू महाराज यांना चर्चेसाठी निमंत्रण!