बातम्या

मराठा नेते विनोद पाटील छ. संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी?

Maratha leader Vinod Patil Ch Will contest Lok Sabha from Sambhajinagar


By nisha patil - 2/3/2024 7:44:36 PM
Share This News:



मराठा नेते विनोद पाटील छ. संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी?

छत्रपती संभाजीनगर: गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणासाठी  सुरु असलेल्या न्यायालयीन लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान असणारे मराठा नेते विनोद पाटील हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. विनोद पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना आपण छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या पक्षाकडून मला छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी, अशी इच्छाही बोलून दाखवली. त्यामुळे आता यावर एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
  मराठा आरक्षणाची लढाई निर्णायक टप्प्यावर पोहोचली असताना विनोद पाटील यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याविषयी आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटले की, आतापर्यंत आम्ही रस्त्यावरची लढाई, न्यायालयीन लढाई लढलो. पण समाजव्यवस्थेत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी सभागृहात जाणे गरजेचे आहे. अठरापगड जातीच्या कार्यकर्त्यांनी मला लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह केला. आता मी सभागृहात गेले पाहिजे. तरुण, शेतकरी, महिला आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सभागृहात मांडला तर त्याला अधिक बळकटी मिळेल, असे सर्वांचे म्हणणे आहे. त्यासाठी या सगळ्यांनी माझ्याकडे लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह धरला. हा आग्रह मान्य करुन मी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे आणि विनोद पाटलांची उमेदवारीबाबत चर्चा
यावेळी विनोद पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या तिकीटावर छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी माझी राजकीय चर्चा झाली होती. या चर्चेवेळी त्याठिकाणी अनेकजण हजर होते. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला विचारले होते की, तुझ्या निवडणुकीचं काय? तेव्हा मी म्हटलं होतं, आता तरी मला निवडणूक लढवण्यात काही रस नाही. पण मराठा आरक्षण मिळाल्यावर मी लोकसभा लढवेन, असे मी त्यांना म्हणालो होतो. सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 4 आमदार आहेत. गेल्या 20-25 वर्षांपासून संभाजीनगरमध्ये हिंदू समाज धनुष्यबाणाला मतदान करत आला आहे. हिंदू समाजाला धनुष्यबाणाशिवाय मतदान करण्यासाठी दुसरं चिन्हंच उपलब्ध नव्हते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही छ. संभाजीनगरची जागा एकनाथ शिंदे यांना सुटेल. त्यांना ही जागा सुटली तर एकनाथ शिंदे येथून लढण्यासाठी मला आशीर्वाद देतील. ते मला छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेची उमेदवारी देतील, अशी आशा असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.


मराठा नेते विनोद पाटील छ. संभाजीनगरमधून लोकसभा लढवणार; एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून उमेदवारी?