विशेष बातम्या

आषाढी यात्रेसाठी विठुरायाच्या शेकडो सुबक दगडी मुर्त्यांची बाजारपेठ सज्ज

Market of hundreds of beautiful stone idols of Vithuraya is ready for Ashadhi Yatra


By nisha patil - 6/14/2023 4:39:01 PM
Share This News:



तारा न्यूज वेब टीम मानला तर देव नाही तर दगड या म्हणी प्रमाणे देव आणि दगड यांच्यातील दोन टोकांचे अंतर मिटवण्याचे सामर्थ्य शिल्पकलेमध्ये आहे.  म्हणूनच अष्ट कलातील एक कला म्हणून शिल्पकलेची ओळख आहे. अतिशय प्राचीन काळापासून विठुरायाच्या या नगरीत ही कला जोपासली जातेय आणि म्हणूनच वर्षभर येथे बनविलेल्या शेकडो आकर्षक दगडी मुर्त्या देशभर आणि अगदी सातासमुद्रापार जात असतात. आषाढी महासोहळ्यासाठी मागणीनुसार दगडी मुर्त्या बनविण्यासाठी कारागीर सध्या रात्रंदिवस झटत आहेत.  यात्राकाळात या व्यवसायातून लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याने यंदा आषाढीसाठी  मोठ्या प्रमाणात या मुर्त्या बनवून ठेवण्यात आल्या आहेत. विठुराया आणि विविध संतांच्या मुर्त्या हे पंढरपूरचे खास वैशिष्ट्य असते  म्हणूनच वाड्या वस्त्यापासून मोठमोठ्या शहरातील मंदिरात पंढरपुरात  बनलेल्या दगडी मुर्त्या विराजमान झालेल्या दिसतात . ओभड धोभड दगडातून आकर्षक ,रेखीव प्रसन्न भावमुद्रा तयार करण्याची कला म्हणजे ही शिल्पकला. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही म्हणूनच दगडातून साकारणाऱ्या परब्रह्म रुपाला देवपण येते जे जगभर पूजनीय ठरते. विठुरायाच्या पंढरपूरमध्ये दरवर्षी लाखोंची उलाढाल करणारा व्यवसाय म्हणजे मूर्तीकला. आषाढी आणि इतर यात्रा काळात देशभरातून येणारे भाविक विठ्ठल रुक्मिणी आणि विविध संतांच्या मुर्त्या येथून घेऊन जाऊन आपापल्या गावात त्याची मंदिरात आणि घरात प्रतिष्ठापना करतात. आधीच्या यात्रेला येऊन आपल्याला हव्या त्या आकाराची मूर्ती तयार करायला सांगून पुढच्या यात्रेत ती घेऊन जायची वारकरी संप्रदायात प्रथा आहे


आषाढी यात्रेसाठी विठुरायाच्या शेकडो सुबक दगडी मुर्त्यांची बाजारपेठ सज्ज