वेगवेगळ्या प्रकारचे तेल किंवा मग शॅम्पू किंवा कंडिशनर बदलून बघतात. मात्र तुम्ही कधी केसांना तूप लावून पाहिले आहे का? केसांना तूप लावण्याचे फायदे आयुर्वेदात सांगितले आहे. तूप लावल्यास केसांची वाढ होते त्याचबरोबर केस दाट होतात.
तूपात असलेल्या अँटी इफ्लेमेटरी गुणांमुळं आणि अँटी ऑक्सीडेंट्सचा चांगला स्त्रोत असल्यामुळं केसांच्या अनेक समस्या दूर होतात. पण केसांना तूप लावायचे कसे व त्याचे नेमके काय फायदे होतात हे जाणून घेऊया.
केसांना तेल लावण्याचे फायदे
केसांची वाढ होते
केसांना तूप लावल्यास स्कॅल्पचे रक्ताभिसरण वाढते यामुळं केसांची वाढ होते व दाट होतात. तसंच, तूपाने केसांच्या मुळांना मसाज केल्यास केस वाढ होण्यास मदत तर होतेच पण त्याचबरोबर केस कमी गळतात. केसांना थेट तूप लावू नये. सगळ्यात आधी तूप थोडे गरम करावे त्यानंतर बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना लावा. तुम्ही रात्रभर केसांना तूप लावून ठेवू शकता किंवा केस धुवायच्या एक तास आधीदेखील तूप केसांना लावू शकता.
कोंडा कमी होईल
केसातील कोंडा कमी करण्यासाठीही तूप फायदेशीर आहे. एका वाटीत दोन चमचे तूप घेऊन त्यात एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बदामाचे तेल मिसळून घ्या. आता हे मिश्रण स्कॅल्पला व्यवस्थित लावून घ्या आणि एक तासानंतर केस धुवून घ्या. केसांतील कोंडा कमी होईल.
केस मऊ होतील
केसांना साध तूप लावूनदेखील केस मऊ होतील. मात्र, नारळाच्या तेलात तूप मिसळून लावल्यास केस अधिक मुलायम होतील. एक चमचा नारळाच्या तेलात त्याच प्रमाणात तूप घ्या. त्यानंतर हे मिश्रण केसांना लावा व दीड तासानंतर केस धुवून घ्या. आठवड्यातून एकदातरी हे करुन बघितल्यास काहिच दिवसांत रिझल्ट दिसून येईल.
स्कॅल्पला पोषण मिळते
ज्या लोकांचे केस गरजेपेक्षा जास्त कोरडे असतील त्यांनी आठवड्यातून एकदा तरी तूप लावाच. केसांना तूपाने मसाज केल्यास स्कॅल्पला पोषण मिळते. केसांचा रुक्षपणा कमी होऊन केस सॉफ्ट, सिल्की आणि शाइनी होतात.