विशेष बातम्या
विनायक राऊत यांच्यासारख्या चांडाळचौकडी मुळेच "मातोश्री" चे बुरुज ढासळले : श्री.राजेश क्षीरसागर
By nisha patil - 5/31/2023 5:24:15 PM
Share This News:
कोल्हापूर दि.३१ : विनायक राऊत जिथे जातात तिथे पक्षांतर्गत दोन गट पाडून वाद निर्माण करण्याचे काम करतात. विनायक राऊत यांच्या सारख्या चांडाळचौकडी मुळेच "मातोश्री" चे बुरुज ढासळले आहेत, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. काल खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत क्षीरसागर यांनी खासदार राऊत यांच्यावर प्रसिद्धी पत्रकाद्वारे टीकास्त्र सोडले.
यात राजेश क्षीरसागर यांनी पुढे म्हंटले आहे कि, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना - भाजप युती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अभेद्य आहे. पण या उलट जागावाटपावरून महाविकास आघाडीत असलेला असंतोष, बेबनाव समोर येत आहे. महाविकास आघाडीत मोठा भाऊ आणि छोटा भाऊ यापलिकडे जनतेसमोर जाण्यास कोणतीच ठोस भूमिका नाही. त्यामुळे शिवसेना - भाजप युतीवर खोटे आरोप करून जनतेत संभ्रम पसरविण्याचे चाळे राऊत यांच्यासारख्यांकडून सुरु आहेत. मुख्यमंत्री शिंदे हे कुटुंबप्रमुखांची भूमिका योग्य रीतीने बजावत असून, आमच्या शिवसेनेत सर्वांना समान मानसन्मान मिळत असल्याने कोणताही असंतोष नाही त्यामुळे आमदार - खासदार पुन्हा जाण्याचा सवालच उपस्थित होत नाही. तर त्यांच्याच गटात शिल्लक उरले - सुरले शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील खऱ्या शिवसेनेत येतील.
खासदार विनायक राऊत हे २००४ पासून शिवसेनेत जास्त कार्यरत झाले. त्यानंतर जिथे जातील तिथे पक्षांतर्गत वाद लावण्याची त्यांनी कार्यपद्धती अवलंबलीच यासह कार्यतत्पर पदाधिकारी, लोकप्रतिनिधींच्या विरोधात "मातोश्री" चे कान फुंकण्याचे काम केले. गेल्या काही वर्षात राऊत यांच्यासारख्या तीन- चार जनांनी मातोश्री ला घेरले असून, उरला- सुरला गट संपविण्याचे काम करत आहेत.
खासदार विनायक राऊत यांनी विकासकामांच्या बाबत शिवसेनेत असंतोष असल्याचे म्हंटले, पण खासदार विनायक राऊत संकोचित बुद्धीचे असून, त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्यास देण्यात आलेल्या निधीची माहिती घ्यावी. याचपद्धतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विकासकामांची गंगोत्री वाहत असून, जनतेमधूनही याचे स्वागत होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील असंतोष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढती लोकप्रियता, पराभवाची चिंता या कारणांनी खासदार विनायक राऊत वैफल्यग्रस्त झाले असून, त्यातूनच अशा टीका करत असल्याचे टीकास्त्र राजेश क्षीरसागर यांनी सोडले आहे.
विनायक राऊत यांच्यासारख्या चांडाळचौकडी मुळेच "मातोश्री" चे बुरुज ढासळले : श्री.राजेश क्षीरसागर
|