राजकीय

मविआ सरकार महिलांना सन्मानाने तीन हजार रुपये प्रतिमाह देणार - अलका लांबा

Mavia government will pay Rs 3 000 per month with respect to women


By nisha patil - 12/11/2024 10:01:26 PM
Share This News:



मविआ सरकार महिलांना सन्मानाने तीन हजार रुपये प्रतिमाह देणार - अलका लांबा 

राजू लाटकरना विजयी करुन खंडणीमुक्त शहर घडवण्याचे आवाहन

कोल्हापूर: महाविकास आघाडी सरकार महिलांना प्रतिमाह तीन हजार रुपये देणार आणि ते सुद्धा सन्मानाने देणार अशी घोषणा राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी केली. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचारार्थ राजारामपुरी येथे प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या सभेला त्या संबोधित करीत होत्या.

राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या सरचिटणीस आरती सिंग, आर. के. पोवार, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई, सरलाताई पाटील, भारती पवार, संध्या घोटणे, प्रवीण इंदुलकर, विशाल देवकुळे, दिनेश परमार, दिलीप शेटे, भारती पोवार, महेश उत्तुरे, दत्ता टिपुगडे, कॉ. चंद्रकांत यादव, पूजा नाईकनवरे हे प्रमुख उपस्थित होते. सत्तेत बसलेले असंवैधानिक सरकार जनतेचेच पैसे महिलांना देत आहे मात्र त्यासाठी त्यांना लाचारी पत्करायला लावत आहे. आता तर ते महिलांना धमकावीत आहेत. जनतेने महायुती सरकारला पराभूत करून त्यांना धडा शिकवावा लागेल. संविधानाने सर्वांना एकतेचा समान अधिकार दिला आहे, पण विरोधकांना त्यात लाल रंग दिसतो आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे आराध्य दैवत. पण त्यांच्या पुतळ्यातही सत्तेत बसलेल्या गद्दारांनी भ्रष्टाचार केला व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही उलट ज्यांनी मागणी केली त्यांच्यावर हल्ला केला.

यातूनच त्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. याउलट आपल्या उद्योगपती मित्रांचे १६ लाख करोड रुपये माफ केले. शेतकऱ्यांच्या मुळावर सातत्याने घाव घालण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे त्यामुळे महायुतीचा पराभव करावाच लागेल. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात तुम्हाला अनेक प्रलोभने दाखविली जातील, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून आपल्या हक्काचा राजेश लाटकर यांना विजयी करायचे आहे असे अलका लांबा म्हणाल्या. यावेळी बोलताना सरलाताई पाटील म्हणाल्या, काँग्रेसने श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना अशा कित्येक योजना आणल्या पण त्याचा कधीही बॅनर, जाहिराती देऊन गाजावाजा केला नाही. महिला कोणत्या पक्षाच्या आहे हे न पाहता सर्वाना त्याचा लाभ दिला.

उमेदवार राजेश लाटकर म्हणाले, राज्याचे नियोजन करण्याची जबाबदारी असणाऱ्या विरोधी उमेदवारांच्या कारभाराने कोल्हापूरची दुर्दशा करून ठेवली आहे. रस्ते सुस्थितीत नाहीत, पाण्याचे असमान वितरण, कचऱ्याचे ढीग वाढले आहेत. केवळ खंडणी व कमिशन हेच धोरण असलेल्या आमच्या विरोधकाने शहर भकास करून स्वतःचा विकास केला. दहशतीचे हे वातावरण संपवण्यासाठी येत्या २० तारखेला प्रेशर कुकर या माझ्या चिन्हापुढील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना प्रतिज्ञा उत्तुरे म्हणाल्या, शिवसेनेने आपल्या जाहीरनाम्यात समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करून त्याप्रमाणे लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातून प्रत्येक घटक सक्षम, स्वावलंबी होण्यास मदत होईल. या सभेत सुनील मोदी, रविकिरण इंगवले, संदीप देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी राजारामपुरी परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 


राजू लाटकरचे एकच मिशन 'नो खंडणी, नो कमिशन'
आमदार झाल्यानंतर मतदारसंघातील हातभट्टीवाले तसेच गांजा, चरस विक्री करणाऱ्यांना मोका लावल्याशिवाय राहणार नाही. जनतेचा सर्वसामान्य आमदार म्हणून निस्वार्थी जनसेवा व 'नो खंडनी नो कमिशन' हेच माझे मिशन असेल असे राजेश लाटकर म्हणाले.


मविआ सरकार महिलांना सन्मानाने तीन हजार रुपये प्रतिमाह देणार - अलका लांबा