बातम्या
कागलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
By nisha patil - 6/4/2024 1:20:53 PM
Share This News:
कागल, दि. ६: लोकनेते व पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस बुधवार दि. १७ एप्रिल रोजी प्रभू श्रीरामनवमी दिवशी येत आहे. लोकसभेचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांना कागल तालुक्यातील प्रचंड मताधिक्य हीच पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाची खरी भेट ठरेल, असे प्रतिपादन केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी केले. कार्यकर्त्यांनो, त्यांच्या विजयासाठी आणि प्रचंड मताधिक्यासाठी जिवाचे रान करा. कागल तालुक्यातून मिळणारे प्रचंड मताधिक्य हेच त्यांच्या विजयाचे लीड ठरेल, असे ते म्हणाले.
कागलमध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त कागलमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत श्री. माने बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी गोकुळ दूध संघाचे संचालक युवराज पाटील होते.
भाषणात श्री. माने म्हणाले, अनेक जणांच्या तक्रारी आणि अभ्यासातून पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांचा वाढदिवस प्रभू श्रीरामनवमी दिवशीच येतो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यांचा वाढदिवस हा लोकोत्सव म्हणून दरवर्षी आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने समाजविधायक उपक्रमांनी साजरा करीत असतो. यावर्षीही लोकसभेची निवडणूक असली तरी आचारसंहितेच्या मर्यादेत राहून गावागावातील मंदिरे, शाळा, सार्वजनिक ठिकाणे यांची साफसफाई रक्तदान, आरोग्य शिबिरे अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करा. तसेच; पालकमंत्री श्री. मुश्रीफसाहेब यांनी केलेल्या विविध विकासकामे आणि विधायक कामांचे डिजिटल फलक लावा.
संकल्प प्रचंड मताधिक्याचा.......!
श्री. माने म्हणाले, या लोकसभा निवडणुकीत ८५ वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांना आणि दिव्यांग नागरिकांना घरातून मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. कागल तालुक्यामध्ये अशा मतदारांची संख्या दहा हजारांवर आहे. श्री. मुश्रीफसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यादिवशी अशा मतदारांच्या घरी जाऊन प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचंड मताधिक्याच्या विजयाचा संकल्प त्यांना सांगा.
भाषणात श्री. माने पुढे म्हणाले, गेल्या वर्षी कमी पाऊस पडल्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळत आहे. त्यामुळे, पालकमंत्री हसनसाहेब मुश्रीफ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पाणी बचतीचा संदेशही घरोघरी द्या. शेतीच्या पाण्यासह पिण्याचे पाणीही काटकसरीने वापरण्याची जनजागृती समाजात करा, असेही ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर तात्यासाहेब पाटील, चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, मनोजभाऊ फराकटे, नितीन दिंडे, विकास पाटील, संजय चितारी, अर्जुन नाईक, अतुल मटूरे, आर. व्ही. पाटील, रवींद्र पाटील, जयदीप पवार, दिनकरराव कोतेकर, सतीश घाडगे, प्रमोद पाटील, ॲड. जीवनराव शिंदे, नेताजीराव मोरे, शशिकांत नाईक, नवाज मुश्रीफ, अस्लम मुजावर आदी प्रमुख उपस्थित होते.
कागलमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न
|