बातम्या
प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
By nisha patil - 5/7/2023 7:39:55 PM
Share This News:
प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिगे)- मुद्रण क्षेत्रातील व्यवसायिक व कर्मचारी बंधूंच्या गुणवान विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा इचलकरंजी येथील नाईट कॉलेजच्या श्रीमती सरोजिनीताई खंजिरे सभागृहामध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिशा इंग्लिश मिडियम स्कूल व शरद इंग्लिश मिडियम स्कूल चे प्रिन्सिपल अशोक शेट्टी होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दे.भ. बाबासाहेब भाऊसाो खंजिरे शिक्षण संस्थेचे चेअरमन अरुण खंजिरे हे होते.
आषाढी एकादशीचे औचित्य साधून कार्यक्रमाची सुरुवात असोसिएनचे सचिव संजय निकम यांनी पांडुरंगाचा अभंग गायन करुन केली. आजची शिक्षण पद्धती, जीवन पद्धती तसेच येणारा भविष्यकाळ याबद्दल सुयोग्य असे मार्गदर्शन अशोक शेट्टी यांनी उपस्थित गुणवान विद्यार्थी व त्यांच्या पालकांना केले. सध्या चाललेल्या जातीवादी व धर्मवादी वातावरणात विद्यार्थ्यांनी कसे राहावे याबद्दल विशेष मार्गदर्शन शेट्टी यांनी केले. याबरोबरच जीवनामध्ये शरीर आणि मन शशक्त ठेवायचे असेल तर योगा करणे महत्त्वाचे आहे असा बहुमोल सल्लाही सरांनी दिला.
अध्यक्षीय भाषणात अरुण खंजीरे यांनी शिक्षणाचे महत्त्व व प्रिंटर्स असोसिएशनचे कार्य याबद्दल बहुमोल भाष्य केले. भविष्यात ही प्रिंटर्स असोशियन बरोबर राहू अशी ग्वाही दिली. प्रिंटर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री. महादेवजी साळी यांनी प्रास्ताविक केले. गेली बारा वर्षे झाली प्रिंटर्स असोसिएशन सभासदांच्या व त्यांच्याकडे असणार्या कर्मचारी बंधूंच्या मुलांमध्ये शिक्षणाबद्दल गोडी वाढावी आणि त्यांनी भविष्यात असेच सुयश मिळवावे यासाठी अशा गुणवान विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम प्रिंटर्स असोसिएशन करत आले आहे. तसेच मुद्रकांच्या हितासाठी जे काही करता येईल ते सर्व करण्याची तयारी असोसिएशनची आहे असे विचार श्री. साळी यांनी व्यक्त केले.
विशेष उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांबरोबरच प्रिंटर्स असोसिएशनचे सभासदांपैकी ज्यांची इतरही विविध पदांवर निवड झाली अशांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य विद्यार्थी त्यांचे पालक मुद्रक बंधू उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन असोसिएशनचे उपाध्यक्ष सिताराम शिंदे यांनी केले. पाहुण्यांची ओळख संचालक दीपक वस्त्रे यांनी केली. आभार संचालक श्री रणजीत पाटील यांनी मांडले या वेळी खजिनदार कलगोंडा पाटील तसेच संचालक विनोद मद्यापगोळ, नरेश हरवंदे, राकेश रुग्गे, गणेश वरुटे, स्वप्निल नायकवडे, सुधाकर बडवे, दीपक फाटक, सल्लागार श्री. दिनेश कुलकर्णी, शंकरराव हेरवाडे, संजय आगलावे, संतराम चौगुले हे उपस्थित होते.
प्रिंटर्स असोसिएशन इचलकरंजी तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
|