बातम्या

गोकुळच्या हिरकमहोत्सवी वाटचालीत दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या बलवान

Milk producers financially strong in the run up to Gokuls Diamond Jubilee


By Administrator - 3/16/2024 10:54:33 AM
Share This News:



 दुधाची उच्चतम गुणवत्ता आणि दर्जेदार उत्पादनं म्हणजे गोकुळ !

कोल्हापूर :सहकार तत्वावर चालणाऱ्या या संस्थेने उत्तम कारभार करत लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलविला. १६ मार्च १९६३ रोजी या दूध संघाची स्थापना झाली. सहा दशकाहून अधिक कालावधीत दिमाखदार वाटचाल साऱ्यांनाच भूषणावह. दूध उत्पादकांचे हित जपत, त्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर पोहोचला. गोकुळच्या हिरकमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ शनिवारी (१६ मार्च २०२४ ) होत आहे. यानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हिरकमहोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्तानं गोकुळच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर टाकलेला दृष्टीक्षेप….

खरं तर, हिरकमहोत्सवी वर्ष, साहजिकच कोणत्याही संस्थेसाठी गौरवास्पदबाब. ६१ वर्षांचा हा प्रवास संस्थात्मक पातळीवर अतिशय मोलाचा. गोकुळ तर कोल्हापूरशी एकरुप झालेला दूध संघ. लाखो दूध उत्पादकांच्या जीवनात आर्थिक क्रांतीच घडली. शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाई. आता मात्र दुग्ध व्यवसाय हा मुख्य व्यवसाय बनला आहे. या व्यवसायाने शेतकऱ्यांना स्वतच्या पायावर उभं केलं. महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविलं. तरुणांच्या हाताला रोजगार दिला. दर दहा दिवसाला ७० कोटीहून अधिक रक्कम दूध उत्पादकांच्या बँक खात्यावर जमा करणारा गोकुळ हा एकमेव दूध संघ. गोकुळची वार्षिक उलाढाल आज साडेतीन हजार कोटीहून अधिक आहे. आजपर्यंतचा गोकुळचा प्रवास हा या क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रेरणादायी आहे.

सहकारमहर्षी आनंदराव पाटील -चुयेकर यांच्या अविरथ प्रयत्नातून आणि उदात्त दृष्टीकोनातून संघाची उत्तमरित्या जडणघडण झाली. एन. टी. सरनाईकांची साथ लाभली. १६ मार्च १९६३ रोजी संघाची स्थापना झाली. प्रारंभीच्या कालावधीत २२ संस्था आणि ७०० लिटर दूध संकलन होते. मात्र संघाचे नेतृत्व करणाऱ्या धुरिणांनी काळाची पावलं ओळखत दूध संघात आमूलाग्र बदल केले. श्वेतक्रांतीचे जनक वर्गीस कुरियन यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. संघाचा विस्तार आणि शेतकऱ्यांचा विकास हे सूत्र डोळयासमोर ठेवून धोरणं आखली. १९८५ मध्ये गोकुळ शिरगाव येथे ऑपरेशन फ्लड योजनेंतर्गत राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाच्या (एनडीडीबी) तांत्रिक व आर्थिक सहाय्य घेऊन संघाची अद्ययावत डेअरी व पावडर प्लांटची उभारणी. संघाची सध्यस्थितीत प्रतिदिन दूध हाताळणी क्षमता १७ लाख लिटर व दूध पावडर निर्मिती इतकी आहे. कणीदार गाय व म्हैस दूध तूप, ईलायची श्रीखंड, आंबा, फ्रूट, केशर, टेबल बटर, कुकिंग बटर, दही, लस्सी, पनीर, ताक, बासुंदी, कोल्हापुरी पेढा या उत्पादनांची निर्मिती. सुगंधी दूधाची विक्री होते. टेट्रा पॅकमध्ये दूध व लस्सी, मसाले ताक याच बरोबर मार्केटमध्ये  चॉकलेट, व्हेनिला, पिस्तार व स्ट्रॉबेरी या चार फ्लेअवरमध्ये सुगंधी दूध पेट जार बॉटलमध्ये उपलब्ध आहेत. तसेच गोकुळ शक्ती या नवीन टोन्ड दुध मार्केट मध्ये आणले आहे.

 

वीस लाख लिटर दूध संकलनाचे उद्दिष्ट..

          गोकुळच्या संचालक मंडळाने वीस लाख लिटर दूध संकलनाचा उद्दिष्ठ ठेवले आहे. त्यादृष्टीने गोकुळकडून म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजना आखल्या आहेत. दूध उत्पादकांच्या घरापर्यंत भेटी देऊन दूध उत्पादन वाढीसाठी पाठपुरावा करत आहेत. संचालकांची त्यांना साथ लाभत आहे. भविष्याचा वेध घेत नवी मुंबई वाशी येथे नवीन दुग्ध शाळा उभारणी केली. बाजारपेठेचा अभ्यास करुन, ग्राहकांच्या आवडीनिवड जाणत नवनवीन उत्पादने बाजारात आणली. मुंबई, ठाणे, पुणे, गोवा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, चिपळूण, कुडाळ, नाशिक, सोलापूर येथे दूध विक्री. स्थानिक कोल्हापूर बाजारपेठ नजीकच्या इचलकरंजी, सांगली, मिरज, कराड, सातारा, बेळगाव, निपाणी येथे पिशवीबंद दूध इन्सुलेटेड वाहनामधून ग्राहकांपर्यंत पोहचिण्यात येते. भारतीय नौदल सेना कारवार, टी ए बटालियन गोकुळ सिलेक्ट या टेट्रा पॅक दुधाचा पुरवठा करण्यात येतो. दूध उत्पादकांसाठी ना नफा –ना तोटा या तत्वावर पशुखाद्य कारखाना चालविला जातो.


गोकुळच्या हिरकमहोत्सवी वाटचालीत दूध उत्पादक आर्थिकदृष्ट्या बलवान