बातम्या

शिवाजी विद्यापीठाचा ‘आय.सी.ए.आय.’समवेत सामंजस्य करार

MoU of Shivaji University with ICAI


By neeta - 1/30/2024 12:45:45 PM
Share This News:



कोल्हापूरदि. २९ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठाचा नवी दिल्ली येथील दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडिया या आघाडीच्या संस्थेसमवेत नुकताच सामंजस्य करार झाला आहे. या कराराचा विद्यापीठाचे विद्यार्थी तसेच शिक्षकांनाही मोठा लाभ होईल, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केली.

नवी दिल्ली येथे नुकतीच नॅशनल एज्युकेशन समिट ऑफ कॉमर्स अँड अकाउन्टंसी २०२४ (नेस्का-2024) या दोनदिवसीय उपक्रमाच्या पहिल्या दिवशी सामंजस्य करार समारंभ पार पडला. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन यावेळी उपस्थित होते. या सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ. जयकुमार बत्रा यांनी स्वाक्षरी केल्या. हा करार होण्यासाठी इन्स्टिट्यूटचे उपसंचालक डॉ. एन.एन. सेनगुप्ता आणि अधिष्ठाता डॉ. महाजन यांनी समन्वयाचे कार्य केले आहे.

दोन्हीही संस्थांनी शिक्षण, संशोधन आणि प्रशिक्षण यामध्ये केलेल्या कार्यातून ज्ञान आणि कौशल्य यासंदर्भात उत्कृष्टता निर्माण करण्याच्या प्रक्रियेसाठी या सामंजस्य कराराच्या माध्यमातून एकत्रित काम करण्याचा निर्णय घेतला आहे. वाणिज्य विषयातील पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक सहकार्य करण्याचे ठरविण्यात आले. त्या माध्यमातून या संस्थांच्या बौद्धिक जीवन व सांस्कृतिक विकास याबाबत सहकार्य केले जाईल. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने इन्स्टिट्यूट विशेष सत्रांचे आयोजन करून विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याच्या कामी सहकार्य करणार आहे. संशोधन प्रकल्प, शिक्षक विकास कार्यक्रम तसेच क्षमता विकास कार्यक्रम आणि कार्यशाळापरिषद व चर्चासत्र असे शैक्षणिक कार्यक्रमही संयुक्तपणे आयोजित करण्यात येतील. शैक्षणिक व व्यवसायिक ज्ञान व कौशल्याची देवाण-घेवाण यामुळे विद्यार्थी व शिक्षकांना या सामंजस्य कराराचा लाभ होणार आहे.


शिवाजी विद्यापीठाचा ‘आय.सी.ए.आय.’समवेत सामंजस्य करार