बातम्या

महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

More and more youth of the district should participate in Maharojgar Mela


By nisha patil - 2/23/2024 7:44:58 PM
Share This News:



महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

ठाण्यात  29 फेब्रुवारी व 1 मार्चला राज्यस्तरीय तर 2 मार्चला बारामतीत पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

कोल्हापूर, दि. 23 : जिल्ह्यातील अधिकाधिक बेरोजगार युवक, युवतींना रोजगाराची संधी मिळवून देण्यासाठी ठाणे येथे होणारा राज्यस्तरीय व बारामती येथे होणाऱ्या विभागीय नमो महारोजगार मेळाव्यात अधिकाधिक बेरोजगार उमेदवार सहभागी होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना देवून महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले.

ठाणे पश्चिम येथील हायलँड ग्राऊंड, ढोकाळी, माजिवडा येथे 29 फेब्रुवारी व 1 मार्चला राज्यस्तरीय तर बारामतीतील विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयात 2 मार्च रोजी विभागीय नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या प्रभारी सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक संकेत कदम, गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (गोशिमा), मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन ऑफ कागल, हातकणंगले एमआयडीसी (मॅक) आणि शिरोली मॅन्यु. असो. (स्मॅक), कोल्हापूर चे सदस्य, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
 

श्री. येडगे म्हणाले, शहरासह ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांपर्यंत या रोजगार मेळाव्याची माहिती पोहचवून जास्तीत जास्त उमेदवारांना या मेळाव्याचा लाभ मिळवून द्या. ठाणे आणि बारामती येथे होणाऱ्या या मेळाव्यामध्ये जिल्ह्यातील अधिकाधिक बेरोजगार युवक युवतींनी सहभागी होण्यासाठी सर्व विभागांनी प्रोत्साहन द्यावे. जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगाराची संधी मिळण्यासाठी त्यांना या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा, जेणेकरुन युवकांना पुणे, मुंबई सारख्या मोठ्या शहरांत रोजगाराची संधी मिळेल, असे सांगून गोशिमा, मॅक आणि स्मॅक असोसिएशनच्या सहकार्यातून जिल्हा स्तरावर रोजगार मेळाव्याचे आयोजन करा. महारोजगार मेळाव्याबरोबरच स्तरीय रोजगार मेळाव्यात इंडस्ट्री असोसिएशनने सहभागी व्हावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

नमो महा रोजगार मेळाव्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक युवतींनी अधिक माहितीसाठी,www mahaswayam.gov.in वर संपर्क साधा, असे आवाहन संगीता खंदारे यांनी केले.


महारोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील अधिकाधिक तरुणांनी सहभागी व्हावे -जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन