बातम्या

'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमातून 11 दिवसांत 5 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा

More than 5 lakh patients served in 11 days through Arogya Wari Pandhari Chi Dari initiative


By nisha patil - 10/7/2024 1:20:05 PM
Share This News:



आषाढी वारीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीच्या दिशेने निघालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम राबवित आहे. या उपक्रमातून गेल्या ११ दिवसांत ५ लाख १२ हजार ५५३ वारकऱ्यांवर विनामूल्य उपचार करण्यात आले आहेत. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आला आहे.

            संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसह राज्यातील विविध जिल्ह्यांतून पंढरपूरला निघालेल्या संतांच्या पालख्या आणि राज्यातील सुमारे एक हजार दिंड्यांमध्ये सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले आहेत. त्यांना रस्त्यात काही त्रास जाणवला की लगेच उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य विभागाने सलग दुसऱ्या वर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' हा उपक्रम हाती घेतला आहे. प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना तयार केला असून ६ हजार ३६८ आरोग्य अधिकारी, कर्मचारी वारकऱ्यांना आरोग्य सेवा देत आहेत. तात्पुरत्या रुग्णालयात दाखल करून २,३२७ रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. पालखी आणि दिंडी मुक्कामी असणाऱ्या ठिकाणी ५ खाटांचे तात्पुरते अतिदक्षता विभाग तयार केला आहेत. येथे ऑक्सिजन मॉनिटर, औषधी यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत.

            या आषाढी वारीमध्ये डॉक्टर, नर्स, आरोग्य सहाय्यक, आशा, आरोग्य सेवक, शिपाई, सफाईगार असे सर्व कर्मचारी सेवा देत आहेत. पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सेवेसाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर ‘आपला दवाखाना’ आहे. यासह ताप, सर्दी, खोकला, ड्रेसिंग, जुलाब चा त्रास कोणाला होत असेल तर त्यासाठी अॅम्बुलन्स बाईक तैनात ठेवण्यात आली आहे. आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावर मोठी गर्दी असल्याने प्रत्येक ठिकाणी रुग्णवाहिका फिरू शकत नाही. त्यामुळे फिरती बाईक अॅम्बुलन्स सज्ज ठेवण्यात आली आहे. 

            फिरत्या अॅम्बुलन्सबरोबरच १०२ व १०८ या अॅम्बुलन्सही पालखी मार्गावर सेवा देण्यासाठी कार्यरत आहेत. तसेच पालखीमध्ये दिंडी प्रमुखांना आरोग्य कीट देण्यात आले आहे. याबरोबरच महिलांसाठी प्रत्येक ठिकाणी हिरकणी कक्षाची सोय करण्यात आली आहे.

'आरोग्याची वारी.. पंढरीच्या दारी' उपक्रम थोडक्यात

            प्रत्येक ५ किमी अंतरावर ‘आपला दवाखाना’ :२५८, वारी दरम्यान १०२ व १०८ रुग्णवाहिका २४ बाय ७ उपलब्ध : ७०७,  दिंडी प्रमुखांसाठी वितरीत केलेले औषधी कीट : ५८८५, महिला वारकऱ्यांसाठी स्त्री रोग तज्ज्ञ : १३६, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्षाची स्थापना : १३६, पालखी मार्गावर आरोग्य दूत : २१२, पालखी सोबत माहिती, शिक्षण व संदेशवहन चित्ररथ : ९, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ५ बेडची क्षमता असलेले अतिदक्षता कक्ष : ८७, आरोग्य शिक्षण व संवादावर आधारित आरोग्य ज्ञानेश्वरी उपक्रम.


'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' उपक्रमातून 11 दिवसांत 5 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची सेवा