विशेष बातम्या
मल्टिस्टारर 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर पास, पण प्रेक्षकांकडून नापास
By nisha patil - 6/17/2023 8:16:59 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम ओम राऊत दिग्दर्शित 'आदिपुरुष' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. या सिनेमाची पटकथा रामायणावर आधारित असल्याने या सिनेमाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. पण सिनेमा रिलीज झाला आणि टीका व्हायला सुरुवात झाली. नेटकऱ्यांना या सिनेमातील काही गोष्टी खटकल्याने ते सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त करत आहेत. 'आदिपुरुष'चा टीझर रिलीज झाल्यापासूनच या सिनेमावर टीका होत आहे. जेव्हा रावणाच्या भूमिकेत असलेला सैफ अली खान एका वटवाघुळावरुन येताना दाखवला गेला तेव्हा ट्रोलिंगला सुरुवात झाली. सिनेमातील रावण हा अल्लाउद्दीन खिलजी किंवा एखादा मुघलकालीन क्रूर शासक असावा अशा पद्धतीने रेखाटला गेला आहे. 'आदिपुरुष' सिनेमातील हनुमानाची प्रेक्षकांना उत्सुकता होता. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरु केली.
'आदिपुरुष' हा सिनेमा अतिभव्य बनवण्यासाठी व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. त्यावर तब्बल 500 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. पण त्याचा प्रभाव मात्र पाच कोटींचाही येत नसल्याची तक्रार चाहते करत आहेत. ट्रेलरमधले डायलॉग जेव्हा समोर आले तेव्हा कोणी आक्षेप घेतला नाही. पण सिनेमातील डायलॉगवरदेखील आता टीका होत आहे. संवादलेखक मनोज मुंतशीर सध्या फक्त ट्रोलिंग सहन करत आहेत.
दूरदर्शनवरचं रामायण बघितलेली पिढी तर हे असलं रामायण सहन करु शकणार नाही. पण, पण त्यानंतर 20 वर्षांनी स्टार प्लसवर आलेलं नवं रामायण पाहिलेली पिढीही हे पचवू शकत नाही आहे. त्यामुळेच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस सुरू आहे. देशातल्या दिग्गज समीक्षकांनीही 'आदिपुरुष'ला नापास केलं आहे.
मल्टिस्टारर 'आदिपुरुष' बॉक्स ऑफिसवर पास, पण प्रेक्षकांकडून नापास
|