बातम्या
नागपूर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर
By nisha patil - 5/14/2024 8:46:19 PM
Share This News:
शहरातील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी नागपूर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर आल्याचे बघायला मिळाले आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांनी गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभाग असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला बडतर्फ केले आहे. तर या सोबतच दोन पोलीस कर्मचार्यांवर निलंबनाच्या कारवाईचा बडगा उगारलाय.
नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी नागपूर पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी निवडणूक ड्युटीसाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पाचारण करण्यात आले होते. अशातच 10 मे रोजी नागपुरातील गिट्टीखदान पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले युवराज राठोड आणि आदित्य यादव यांना देखील पुण्यासाठी पाठवण्यात आले होते.
दरम्यान रेल्वेने प्रवास करत असताना या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी रेल्वेत दारू प्यायली आणि दारू प्यायल्यानंतर दोघांनी रेल्वे डब्यातच गोंधळ घालायला सुरवात केली. यावेळी त्यांनी आपल्या एका सहकारी महिला पोलीस कॉन्स्टेबल सोबत दारूच्या नशेत गैरवर्तन करत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर दोघांनीही महिला कर्मचाऱ्यांची छेड काढायला सुरुवात केली. दरम्यान सोबतच्या अन्य कर्मचान्यांनी त्यांना विरोध केला आणि त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, दारूच्या नशेत बुडालेल्या या दोघांनीही सहकार्यांनाच शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.
त्याच वेळी इतर सहकाऱ्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाइल मध्ये कैद केला. त्यानंतर हा सर्व प्रकार इतरत्र व्हायरल झाला होता. तसेच रेल्वेत घडलेल्या या सर्व प्रकरणाची तक्रार पीडित महिलेने आपल्या वरिष्ठांकडे केली होती. त्यानंतर हे प्रकरण पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल यांच्यापर्यंत पोहचताच त्यांनी काल, सोमवारी कठोर कारवाई करत दोघांनाही निलंबित केले आहे.
नागपूर पोलीस पुन्हा अॅक्शन मोडवर
|