बातम्या

नांदेड-संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या

Nanded Sambhajinagar hospital death government murder


By nisha patil - 3/10/2023 8:44:48 PM
Share This News:



 ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही धडा घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये 48 तासांत 31 रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयामध्ये 24 तासांत दोन नवजात बालकांसह 10 जणांचा मृत्यू, या संताप आणणाऱ्या घटना आहेत.  औषधे नसल्याने हे मृत्यू झाल्याचे समोर येत आहे हे अत्यंत चीड आणणारे आहे. 

यासंदर्भात भाजपाप्रणित राज्य सरकारवर तोफ डागत नाना पटोले म्हणाले की, राज्यातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणेला भ्रष्टाचाराच्या भस्म्या रोग झाला असून, संपूर्ण यंत्रणाच व्हेंटिलेटरवर आहे. सरकारी रुग्णालयात पुरेसे डॉक्टर व कर्मचारी नाहीत, औषधांचा तुटवडा आहे. रुग्णालयातील यंत्रसामुग्री नादुरुस्त असल्याने धुळ खात पडलेली आहे. मोठ्या शहरामध्ये आरोग्य सेवांची ही अवस्था आहे. तर ग्रामीण रुग्णालयातील अवस्था काय असेल याची कल्पना न केलेली बरी. शासकीय रुग्णालये मृत्यूचे सापळे झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने 40 टक्क्यांची मलई खाण्यासाठी वेळेत औषधी खरेदी केली नाही. त्यामुळे 2022  मध्ये तरतूद केलेला 600 कोटींचा निधी परत गेला. भाजपा सरकारने 15 ऑगस्टपासून राज्यात मोफत आरोग्य सेवा सुरु केल्याचा मोठा गाजावाजा केला पण रुग्णालयात सरकार सेवा देत नसून मृत्यू देत आहे. भाजपा सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे हेच यावरून दिसत असल्याचे पटोले म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांचे शहर असलेल्या ठाणे शासकीय रुग्णालयात ऑगस्ट महिन्यात एकाच रात्री 18 मृत्यू झाले, त्यावर चौकशी समिती नेमली गेली त्या समितीचे काय झाले? एखांद्या डॉक्टर वा वैद्यकीय कर्मचाऱ्याला निलंबित करुन हे प्रकार थांबणार नाहीत. संबंधित मंत्री आणि मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. सर्वसामान्य जनतेचे मृत्यू होत असताना संबंधित खात्याचे मंत्री काय करतात? मुख्यमंत्र्यांमध्ये थोडीशी संवेदना शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांची हकालपट्टी करावी असेही पटोले म्हणाले.


नांदेड-संभाजीनगर रुग्णालयातील मृत्यू सरकारी हत्या