बातम्या

महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

National Award for Best Performance to Mahavitaran


By nisha patil - 12/1/2025 11:33:25 PM
Share This News:



महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि.१२ जानेवारी २०२५:- शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा कऱण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या नाविन्यपूर्ण योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल महावितरण आणि एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीला शनिवारी बेळगावी येथे आयपीपीएआय पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. त्याचसोबत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विविध वर्गवारीतील एकूण आठ पुरस्कार देऊन महावितरणचा सन्मान करण्यात आला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० चा गौरव झाल्याबद्दल महावितरणचे आणि अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या नेतृत्वाखालील एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीचे अभिनंदन केले. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी मा. मुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून कंपनीच्या गौरवाबद्दल महावितरणचे वीज ग्राहक तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

इंडिपेंडेन्ट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीएआय) या राष्ट्रीय संस्थेने देशभरातील विद्युत कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करून हे पुरस्कार दिले.

सौरऊर्जेचा वापर करून वीजनिर्मिती करायची व त्या आधारे कृषी फीडर्स चालवून शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा करायचा अशी नाविन्यपूर्ण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० महावितरणतर्फे राज्य सरकारचा ऊर्जा विभाग व एमएसईबी सोलर ॲग्रो पॉवर लिमिटेड कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अंमलात येणारी ही योजना शेतकऱ्यांना लाभदायक ठरण्यासोबत उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा कमी करणारी आणि एकंदरितच ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन करणारी आहे. या योजनेमुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यास मदत होणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महावितरणला शनिवारच्या सोहळ्यात दोन पुरस्कार देण्यात आले.

महावितरणचे प्रशिक्षण विभागाचे प्रमुख मुख्य महाव्यवस्थापक दत्तात्रय बनसोडे, वितरण विभागाचे अधीक्षक अभियंता अमित बोकील, विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता शरद बंड, उपकार्यकारी अभियंता आरती कुलकर्णी व सामग्री विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश देठे यांनी कंपनीतर्फे पुरस्कार स्वीकारले.

ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या गटात असाधारण कामगिरी करणारी विद्युत वितरण कंपनी म्हणून महावितरणची निवड कऱण्यात आली. विद्युत वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची कंपनी म्हणून महावितरणला पुरस्कार देण्यात आला. बड्या विद्युत वितरण कंपन्यांच्या गटात पहिल्या तीन सर्वोत्कृष्ट कंपन्यांमध्ये महावितरणचा समावेश झाला.

महावितरणला माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करण्याबद्दल, विकेंद्रित स्वरुपात बॅटरी स्टोरेज सिस्टिम विकसित करण्याबद्दल आणि प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीबद्दल असे आणखी तीन पुरस्कार प्राप्त झाले.


महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय पुरस्कार
Total Views: 47