बातम्या
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धुळे लोकसभेवर दावा, तयारीलाही सुरुवात
By nisha patil - 1/18/2024 4:51:40 PM
Share This News:
मालेगाव : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघ सध्या काँग्रेसकडे आहे. या मतदारसंघावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून निवडणूक लढण्याची तयारी माजी आमदार व पक्षाचे मालेगाव शहराध्यक्ष आसिफ शेख यांनी सुरू केली आहे. आता काँग्रेस हा मतदार संघ सोडणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना आसिफ शेख म्हणाले की, धुळे-मालेगाव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षही लढण्याच्या शर्यतीत आहे. मात्र काँग्रेस पक्षाचा पराभव होत आहे. लाख प्रयत्न करून त्यांना अपयश येत आहे, अशा परिस्थितीत आपण यापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन धुळे लोकसभेच्या जागेवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला संधी द्यावी, अशी मागणी केली होती.
जनमताचा कौल घेणार
शिष्ठमंडळ बनवून मतांचे प्रमाण पाहता शरद पवार शेख रशीद यांना उमेदवारी देण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र आता शेख रशीदसाहेब या जगात नाहीत. मात्र आता राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मतदारसंघात भेटी देऊन जनमताचा कौल घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
धुळे लोकसभेच्या सहा विधानसभा मतदारसंघात धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि सिंधखेडा या तीन विधानसभा मतदारसंघात एक टीम पाठवण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघ आणि त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ, मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य आणि ठाणा विधानसभा मतदारसंघात एक टीम पाठवण्यात येणार असून, या सहा विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी लोकांच्या भेटी घेऊन त्यांचे मत जाणून घेतील आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर धुळे लोकसभेची जागा लढवणार की नाही याचा निर्णय घेतला जाईल.
शरद पवारांकडे करणार मागणी
अहवाल आल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेऊन मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने धुळे लोकसभा जागेवर मालेगावमधून मुस्लिम उमेदवार उभा करून त्यांना संधी द्यावी, असा सूरही आसिफ शेख रशीद यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाचा धुळे लोकसभेवर दावा, तयारीलाही सुरुवात
|