बातम्या

खासगी दोन चाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 15 जुलैपासून सुरु

New registration series of private two wheelers starts from July 15


By nisha patil - 9/7/2024 6:32:11 PM
Share This News:



 खासगी दोनचाकी वाहनांची जुनी नोंदणी मालिका MH09-GS दि. 14 जुलै 2024 पर्यंत संपणे अपेक्षित आहे. त्यानंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत नवीन दोन चाकी नोंदणी मालिका MH09-GT  दि. 15 जुलै 2024 रोजी सुरु करण्यात येत आहे. पसंती क्रमांकाचे अर्ज दि. 15 व 16 जुलै 2024 रोजी सकाळी 9.45 ते 3 या वेळेत खिडकी क्र. 10 येथे स्वीकारण्यात येतील, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांनी दिली.

 वाहन नोंदणी क्रमांकाची मागणी करतेवेळी खालील सूचनांचे पालन करावयाचे आहे.

पसंतीचा नोंदणी क्रमांक घेण्यासाठी अर्जासोबत त्या क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेचा डी.डी. (धनाकर्ष) जोडणे आवश्यक आहे. धनादेश किंवा पे ऑर्डर अर्जासोबत देऊ नये. धनाकर्ष काढताना SBI TRE. BRANCH KOLHAPUR GRAS या नावानेच काढलेला असावा. इतर कोणत्याही नावे काढलेला धनाकर्ष स्वीकारला जाणार नाही. पसंतीच्या क्रमांकाच्या मूळ रकमेचा एकच धनाकर्ष दि. 15 व 16 जुलै 2024 रोजी सकाळी 9.45 ते 2 या वेळेत कार्यालयात सादर करावा. दि. 16 जुलै 2024 रोजी 5 वाजल्यानंतर पसंतीच्या क्रमांकाच्या व (लिलावात गेलेल्या क्रमांकाच्या) याद्या प्रसिध्द केल्या जातील. लिलावातील जादा रकमेचा एकच डीडी स्वीकारण्यात येईल.

धनाकर्षाच्या मागे अर्जदाराचे नाव, मोटार वाहनाचा प्रकार, मोबाईल क्रमांक व मागणी केलेला नोंदणी क्रमांक लिहिणे आवश्यक आहे.

 एखाद्या नोंदणी क्रमांकासाठी एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्या क्रमांकाचा लिलाव करण्यात येईल. त्यासाठी अर्जदारांकडून दि. 18 जुलै 2024 रोजी जादा रकमेचा स्वतंत्र धनाकर्ष बंद लिफाफ्यात सकाळी 9.45 ते 2.30 या कालावधीत जमा करणे बंधनकारक राहील. एका पेक्षा जास्त अर्ज असलेल्या नोंदणी क्रमांकाचा लिलाव दि. 18 जुलै 2024 रोजी दुपारी 4 वा. कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात येईल. अर्जदार व प्राधिकृत प्रतिनिधी यांनाच लिलावास उपस्थित रहाण्याची परवानगी देण्यात येईल. अर्जदाराने ओळखपत्र आणणे आवश्यक आहे. तसेच प्राधिकृत प्रतिनिधी उपस्थित राहणार असेल तर त्याच्याकडे  प्राधिकार पत्रासह ओळखपत्र असणे अनिवार्य आहे. आकर्षक क्रमांकाची मागणी करताना आधारला लिंक असलेलाच मोबाईल क्रमांक व पत्ता लिहिणे बंधनकारक आहे. अर्जावर मोबाईल नंबर लिहिला नसल्यास आपला कोणताही हक्क आकर्षक  क्रमांकावर राहणार नाही. तसेच यादीमध्ये आपले नाव आले तरी आपल्यास आकर्षक क्रमांक मिळणार नाही. एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येत नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी करुन न घेतल्यास राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकार जमा होईल.

 विशिष्ट नोंदणी क्रमांक राखीव ठेवण्यासाठी प्रदान केलेले शुल्क परत करता येणार नाही. नियमित रोखीने पावत्या 23 जुलै 2024 पासून सुरु करण्यात येतील. तसेच पावती झाल्याचा संदेश आपल्या भ्रमणध्वनीवर प्राप्त झाल्यावरच पावती घेण्याकरिता हजर राहून पावती तपासून घ्यावी. वैयक्तिक अर्ज व आकर्षक क्रमांकाच्या फी चा धनादेश वाहनधारकाने फी ची खात्री करुनच जमा करावा. जरी नजर चुकीने धनादेश घेतला गेला व नंतर पडताळणी करताना कार्यालयाच्या निदर्शनास आले तर लिलाव प्रक्रियेत अर्ज बाद करण्यात येईल. महाराष्ट्र मोटर वाहन नियम कलम 54 (A) नुसार ज्या पसंती क्रमांकाची पावतीची मुदत 30 दिवस पूर्ण झालेली असेल असा पावतीवरील आपला हक्क 30 दिवसानंतर संपुष्टात येईल. पसंती क्रमांकाच्या यादीबाबत कोणतीही त्रुटी आढळल्यास एक तासाच्या आत संपर्क साधावा, असे श्री. चव्हाण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे


खासगी दोन चाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 15 जुलैपासून सुरु