तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली: केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर
By nisha patil - 5/31/2023 5:20:50 PM
Share This News:
तारा न्यूज वेब टीम आज जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर करण्यात आलेले आहेत. ही नवी नियमावली ओटीटी माध्यमांसाठी जाहीर करण्यात आली आहे. या नियमांनुसार, आता ओटीटी माध्यमांना तंबाखू विरोधी चेतावणी देणे ,अनिवार्य असणार आहे. तसेच जर ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांमध्ये नव्या नियमांचे पालन करण्यात आले नाही तर, केंद्रीय आरोग्य विभाग आणि माहिती व प्रसारण विभागाकडून संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे.
आरोग्य विभागाकडून या सूचना जागतिक तंबाखू विरोधी दिनादिवशी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यानंतर नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम, हॉटस्टार आमि सोनी यांसारख्या ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांसाठी तंबाखू विरोधात चेतावणी देणे अनिवार्य असणार आहे. चित्रपटगृहांमध्ये आणि टिव्हीवर दाखवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांमध्ये या सूचना दाखवणे आधीच अनिवार्य करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये चित्रपट आणि कार्यक्रमांच्या सुरुवातील आणि मध्ये कमीत कमी तीस सेकंद तंबाखूविरोधात चेतावणीची जाहिरात दाखवणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
30 सेकंदांची जाहिरात अनिवार्य
नव्या नियमांनुसार, तंबाखू उत्पादनाचा उपयोग करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या सुरुवातीला आणि मध्ये कमीत कमी तीस सेकंदांसाठी तंबाखू विरोधातील चेतवाणी देणारी जाहिरात दाखवणे अनिवार्य असणार आहे. तंबाखू विरोधात जागरुकता निर्माण करण्यासाठी आरोग्य विभागाकडून हा उपक्रम राबण्यात येतो. तसेच ओटीटी माध्यमांवरील कार्यक्रमांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याच्या कालावधीत स्क्रीनच्या खाली तंबाखूविरोधात एक प्रमुख संदेश देण्यास देखील अनिवार्य करण्यात आले आहे.
सर्वसाधारपणे चित्रपटांमधील अनेक गोष्टींचा परिणाम बऱ्याचदा आपल्या आयुष्यावर होत असताना पाहायला मिळते. चित्रपटांमधील बऱ्याच गोष्टींचे अनुकरण करण्याचा प्रयत्नही तरुण पिढी हल्ली करत असते. ओटीटी माध्यमांवर सेन्सॉर नसल्यामुळे बऱ्याच गोष्टी सर्रासपणे या माध्यमांवर दाखवल्या जातात. तसेच या माध्यमांचा वापर करणारी ,तरुण पिढीची संख्या भारतात अधिक आहे. या गोष्टींचा विचार करुन केंद्रीय आरोग्य विभागाने ओटीटी माध्यमांसाठी हे नियम अनिवार्य केले आहेत.
तंबाखूजन्य पदार्थांसाठी ओटीटी माध्यमांना नवी नियमावली: केंद्रीय आरोग्य विभागाकडून नवे नियम जाहीर
|