शैक्षणिक
शिवाजी विद्यापीठातील दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेत रंगभूमीचे नव्याने उलगडले पैलू
By nisha patil - 2/18/2025 8:18:45 PM
Share This News:
शिवाजी विद्यापीठातील दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेत रंगभूमीचे नव्याने उलगडले पैलू
शिवाजी विद्यापीठ, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने १७-१८ फेब्रुवारी रोजी 'आवाज, अभिनय आणि रंगभूमीच्या वेगळ्या वाटा' या विषयावर एकूण चार सत्रांमध्ये दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेचे आयोजन केले. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर वर्तक, पुणे यांनी मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थ्यांना आवाजनिर्मिती, आवाजातील गुण-दोष, योग्य उच्चार पद्धती, भावनादर्शकता आणि संवाद समजून घेण्याच्या विविध पैलूंवर सखोल चर्चा केली.
कार्यशाळेत प्रभाकर वर्तक यांनी आवाज आणि अभिनय यांच्यातील परस्पर संबंध, आवाजनिर्मितीची प्रक्रिया तसेच भाषेच्या गुण-दोषांबद्दल मार्गदर्शन केले. तसेच प्राणायमाचे विविध प्रकार व त्यांची प्रात्यक्षिके, प्लेबॅक थिएटर आणि फोरम थिएटरच्या सामाजिक प्रश्नांवरील चर्चेद्वारे रंगभूमीच्या नव्या दिशा उलगडण्यात आल्या.
उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विभागप्रमुख डॉ. विनोद ठाकुरदेसाई यांनी केले, तर डॉ. राजश्री खटावकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि आभार मानले. कार्यशाळेचे आयोजन मल्हार जोशी व अतुल परीट यांनी सुरळीतपणे केले. या उपक्रमात नाट्यशाखेचे डॉ. संजय तोडकर, रवीदर्शन कुलकर्णी, राज पाटील, युवराज केळुसकर आणि किरणसिंह चव्हाण यांचा सक्रिय सहभाग होता.
अधिविभागातील तसेच बाहेरील विद्यार्थ्यांनी आणि रंगकर्मींनी या कार्यशाळेत भरभरून सहभाग घेतला, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कलात्मक कौशल्यांना नवीन दिशा देण्याची संधी प्राप्त झाली.
शिवाजी विद्यापीठातील दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेत रंगभूमीचे नव्याने उलगडले पैलू
|